पहिली भारतीय महिला लढाऊ पायलट युद्धासाठी सज्ज


भारतीय हवाई दलात पहिली लढाऊ महिला पायलट युध्द परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे. फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत हिने तिच्या लढाऊ वैमानिक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला असून ती दिवसा होणाऱ्या युद्धासाठी तयार आहे. दिवसा होणाऱ्या युद्धाला डे ऑप असे म्हटले जाते. भावनाचे रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या युद्धासाठीचे प्रशिक्षण बाकी असून ते पूर्ण केल्यानंतर ती फुल ऑपरेशनल पायलट म्हणून काम करू शकेल.


भावना कांत सध्या राजस्थानातील नाल हवाई तळावर पोस्टेड असून तिची नियुक्ती मिग २१ बायसन फायटर पायलट म्हणून झाली आहे. एकट्याने लढाऊ विमान उडविण्याचा मान अवनी चतुर्वेदी हिला मिळाला होता आणि ती पहिली महिला फायटर पायलट बनली होती. मात्र अवनीचे प्रशिक्षण अजून पूर्ण झालेले नाही. हे प्रशिक्षण विविध टप्प्यात दिले जाते. त्यात प्रथम विमान उडविणे, युद्ध परिस्थितीत हत्यारांचा वापर करणे या प्रकारे असते. भावनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता तिला मून फेज आणि डार्क फेज म्हणजे चांदण्या रात्रीत विमान उडविणे आणि अंधाऱ्या रात्री विमान उडविणे याचे प्रशिक्षण दिले जाईल.

भावना जे मिग २१ बायसन विमान उडविते ते जगात सर्वात जलद लँडिंग आणि टेकऑफ साठी प्रसिद्ध आहे. हे विमान ताशी ३४० किमीच्या वेगाने लँडिंग आणि टेकऑफ करू शकते. जून २०१६ मध्ये भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तिघींची फायटर स्ट्रीम मध्ये प्रथमच महीला पायलट म्हणून नियुक्ती झाली असून ही नियुक्ती ५ वर्षांसाठी आहे.

Leave a Comment