भारतात स्मार्टफोन लाँच न करण्याचा सोनीचा निर्णय


जपानची जानीमानी इलेक्ट्रोनिक कंपनी सोनीने भारतीय बाजारात त्यांचे नवे स्मार्टफोन लाँच न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन बाजारात तीव्र होत चाललेल्या स्पर्धेत सोनी मागे पडत असून त्यामुळे भारतीय बाजारातून पाउल मागे घेण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सोनीच्या मोबाईल पोर्टफोलियो मध्ये कंपनीला सतत नुकसान सोसावे लागत असून त्यामुळे दक्षिण अमेरिका, द. आशिया आणि आफ्रिका येथील बाजारांवर सोनी कमी लक्ष देणार आहे.

कंपनीतील वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार वित्तीय वर्ष २०२० मध्ये कंपनीने नफा कमावणे हेच
मुख्य ध्येय ठेवले आहे. त्यामुळे बाकी खर्च ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सोनी ग्रुप प्रमुख तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची उत्पादने ग्राहकाला अधिक अपील व्हावीत यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेत पेचिंग मधील उत्पादन प्रकल्प बंद करण्यापासून ते जगभरात विक्री संचालन सहज आणि सुलभ करणे याचा समावेश आहे.

सोनीने ५ जी सेवेतून अधिक नफा कसा कमावता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि जपान, युरोप, हाँगकाँग, तैवान मार्केटवर अधिक भर दिला आहे. २०१८ मध्येच सोनीने सेन्ट्रल व दक्षिण अमेरिका, मिडिल इस्ट, द. आशिया बाजारात फोन विक्री बंद केली असली तरी व्यापार संधी मिळताच सोनी स्टोर सारख्या डायरेक्ट चॅनलचा वापर करून फोन विक्री केली जाणार आहे.

कौंट पॉइंट रिसर्च विश्लेषक पर्व शर्मा या संदर्भात म्हणाले, भारतीय बाजारात सोनीचा हिस्सा जवळ जवळ नाही च्या बरोबर म्हणजे फक्त ०.०१ टक्के इतकाच आहे. जपान मध्ये मात्र सोनीची विक्री चांगली आहे आणि त्यामुळे त्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्याचा कंपनीचा निर्णय योग्य आहे. खर्च कमी करण्यसाठी कंपनी पुढच्या वर्षात २ हजार कर्मचाऱ्याना कामावरून कमी करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment