पुरुषांच्या आधी खेळवण्यात आला होता महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा


या महिन्याच्या 30 तारखेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना झाला असून सध्याची विश्वचषक स्पर्धेची क्रेझ आणि जेव्हा पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हाची क्रेझ यात खूप फरक आहे. क्रिकेटमधील रंगतदार सामने, ऐतिहासिक खेळी याबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. पुरुषांसोबतच आता महिलांचे क्रिकेटही लोकप्रिय होत असून पुरुषांच्या आधी महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली होती. पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेला 1973 मध्ये झालेल्या या विश्वचषकाचा अंतिम फेरीच्या 3 दिवस आधी एका बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.

पाकिस्तानचे क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या आठवणी सांगताना म्हटले होते की, विश्वचषक म्हणजे काय हेच त्यावेळी आम्हाला माहिती नव्हते. त्याचे महत्त्व त्यात भाग घेणाऱ्या देशांनासुद्धा माहित नव्हते. विश्वचषक क्रिकेटचा जनक असलेल्या इंग्लंडला एकदाही जिंकला आलेला नाही.

विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाची चर्चा पहिल्यांदा 1972 मध्ये झाली होती. पण दोन देशांची यात अडचण होती. 1965 च्या युद्धामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले होते. दोन्ही देशांनी अशावेळी विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्यास नकार दिला तर फक्त कसोटी खेळणारे चार देश उरतील. यामुळे आयसीसीने आपला विचार पुढे ढकलला. आयसीसीने 25 जुलै 1973 ला महिलांची विश्वचषक स्पर्धा सुरु असताना एक बैठक घेतली. पुरुषांच्या विश्वचषकच्या आयोजनावर यात शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यावेळी डेली एक्सप्रेसने या स्पर्धेला इंटरनॅशनल टूर्नामेंट असे म्हटले होते. पण या स्पर्धेला आयसीसीने ‘विश्वचषक’ असे नाव दिले.

विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पैशांची खरी समस्या होती. आयसीसीने यासाठी टेस्ट अॅण्ड काउंटी क्रिकेट बोर्डाला (टीसीसीबी) स्पर्धेच्या आय़ोजनाची जबाबदारी सोपवली होती. 15 कोटी एवढा खर्च या स्पर्धेसाठी त्यांनी ठरवला होता. पण टायटल स्पॉन्सर 1974 पर्यंत मिळाला नाही. तेव्हा प्रसारण हक्क आणि प्रायोजकत्व यातून आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रुडेंशियल या अमेरिकन विमा कंपनीने त्यावेळी प्रायोजकत्व घेतले आणि विश्वचषकाला प्रुडेंशियल कप असे नाव देण्यात आले. सर्व संघ पहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी एक दिवस आधी पोहोचले होते.

वेस्ट इंडिजने 1975 ला खेळण्यात आलेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावून क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांत कोरले. त्याआधी क्रिकेटमध्ये 1970 च्या दशकात दोनच देशांचे वर्चस्व होते. ते दोन देश म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. समुद्राच्या किनाऱ्यावर खेळणारा देश म्हणजे वेस्ट इंडीज एवढीच ओळख होती. ते जिथेही जायचे तिथे त्यांना मनोरंजन करायला कॅलिप्सो क्रिकेटर्स आले असे म्हटले जायचे. आपली ओळख विंडीजने बदलून दाखवली नाही तर थेट पहिल्या विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले. त्यांनी क्लाईव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन विश्वचषक जिंकले.

भारतामुळे वेस्ट इंडीजची विश्वचषक विजेतेपदाची हॅट्ट्रिक हुकली. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर क्रिकेटची भारतात लोकप्रियता वाढली. त्या विश्वचषकामध्ये झिम्बावे विरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांच्या एका खेळीनंतर भारताने इतिहास रचला होता. कपिल देव फलंदाजीला मैदानात उतरले तेव्हा भारताच्या 4 बाद 9 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कपिल देव यांनी 138 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि 6 षटकार मारले. हा सामना भारताने जिंकल्यानंतर 7 दिवसांनी भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करून जग्गजेतेपद पटकावले.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये 1999 ते 2007 पर्यंत ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व राखले. त्यांनी सलग तीन विश्वचषक जिंकले. 1999 ला पाकिस्तानला तर 2003 मध्ये भारताला पराभूत केले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2003 मध्ये सलग 8 सामने जिंकून फायनलला धडक मारली होती. मात्र, फायनलला कांगारूंसमोर भारताचा खेळ बिघडला.

‘विश्वचषक’ असे प्रुडेंशियल कपला अधिकृत नाव दिल्यानंतर 1987 ते 1999 या दरम्यान 4 विश्वचषकमध्ये प्रत्येकेवेळी नवा विजेता मिळाला. 1987 ला ऑस्ट्रेलिया, 1992 ला पाकिस्तान, 1996 ला श्रीलंकेने विजेतेपद पटकावल्यानंतर 1999 ला पुन्हा ऑस्ट्रेलिया जग्गजेता झाला. गेल्या दोन विश्वचषकमध्ये 2011 ला भारताने तर 2015 ला ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. यात दोन्ही देशांनी मायदेशात अंतिम सामना जिंकण्याची कामगिरी केली. भारताने 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांनी विश्वचषक जिंकला. तर ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये न्यूझीलंडला पराभूत करून पाचव्यांदा विश्वचषकवर नाव कोरले.

Leave a Comment