कामी रिता शेर्पाने आठवड्यात दुसऱ्यांदा लांघले एव्हरेस्ट


जगातील सर्वोच्च शिखर हिमालयातील माउंट एव्हरेस्ट तब्बल चोविसाव्या वेळी आणि आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा लांघण्याचा विक्रम नेपाली शेरपा कामी रिता याने केला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी त्याने २३ व्या वेळी एव्हरेस्ट सर करून स्वतःचाच २२ वेळा एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम मोडला होता आणि या घटनेला आठवडा उलटण्याचा आत मंगळवारी त्याने पुन्हा एकदा एव्हरेस्टला गवसणी घातली आहे.


पर्यटन अधिकारी मीरा आचार्य या संदर्भात माहिती देताना म्हणाल्या, ४९ वर्षाचा कामी रिता याने आठवड्यात दुसऱ्या वेळी एव्हरेस्ट सर केले आहे. त्याने पारंपारिक साउथ इस्ट रिज रूटवरून या ८८५० मीटर म्हणजे २९०३५ फुट उंचीच्या शिखरावर चढाई केली. मंगळवारी अन्य शेरापांच्या सोबत तो एव्हरेस्ट शिखरावर पोहोचला. याच मार्गाने सर्वप्रथम एडमंड हिलरी आणि तेनजिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये प्रथम एव्हरेस्ट सर केले होते. हा मार्ग सर्व गिर्यारोहकांचा आवडता मार्ग आहे.

कामी रिता याने त्याच्या यशाबद्दल बोलताना सांगितले निवृत्तीपूर्वी आणखी एकदा मला एव्हरेस्टचा सागरमाथा गाठायची इच्छा आहे. मी अजून मजबूत आहे, आणि २५ व्या वेळी एव्हरेस्ट लांघायाची माझी मनीषा आहे. निवृत्त होण्यापूर्वी अपा शेरपा आणि फुर्बा शेरपा यांनी २१ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला होता तो कामीने २२ व्या वेळी एव्हरेस्ट सर करून मोडला होता. कामीने २३ व्या वेळी एव्हरेस्ट सर करताना स्वतःचाच विक्रम मोडला होता.

Leave a Comment