मोन्टेसमध्ये राहणाऱ्या जोडप्याना मोफत मिळणार वियाग्रा


फ्रांसच्या मोन्टेस या शहरात राहत असलेल्या आणि कायम वास्तव्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना येथील महापौर जीन डेबोजी यांनी खास भेट देऊ केली आहे. या शहरात येणाऱ्या जोडप्यांना डेबोजी यांनी मोफत वायग्रा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पुरुषांची लैगिक क्षमता वाढविणारी ही गोळी फ्रांस मध्ये डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळू शकत नाही. या गोळ्या देण्यामागे फ्रांसच्या रंगेल मिजाजीचा काही संबंध नाही तर फ्रांस मध्ये घटलेला जन्मदर आणि परिणामी कमी होत चाललेली लोकसंख्या हे मुख्य कारण आहे.


फ्रांस प्रमाणे अनेक युरोपीय देशात जन्मदर प्रचंड घसरला असून तो वाढवा यासाठी अनेक सरकारे विविध सवलती देत आहेत. फ्रांसमध्ये मुल जन्माला आले तर पालकांना करसवलत, मूल तीन वर्षाचे होईपर्यंत पालकांना सुट्टी, मुलांचा खर्च अश्या अनेक सवलती दिल्या जातात. जीन डेबोजी महापौर असलेल्या उत्तर फ्रांस मधील मोन्टेस या शहरात गेल्या काही वर्षात जन्मदर खूपच घटला असून त्यामानाने वृद्धांची संख्या वाढली आहे. डेबोजी म्हणतात, आमच्या शहरात अधिक संख्येने मुले जन्माला यावीत यासठी ही छोटी निळी गोळी वाटावी असे माझे मत आहे कारण ज्या गावात मुले नाहीत त्याचे अस्तित्व एका दिवशी संपणार हे निश्चित. आमच्या गावात पुरेशी मुले नसल्याने दोन शाळा बंद करण्याची नौबत आली आहे.


यावर उपाय म्हणून शहरात जी जोडपी पूर्वीपासून राहत आहेत, त्यांना आणि गावात नव्याने येऊन राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना वियाग्राच्या गोळ्या मोफत देणार आहे. अर्थात आत्ता आमच्याकडे या गोळ्या पुरेशा नाहीत आणि त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात म्हणून स्थानिक कौन्सिलची परवानगी घेत आहोत.

या गोळ्या फ्रांसमध्ये डॉक्टरच्या चिट्ठीशिवाय मिळत नाहीत तरी महापौर त्या मोफत कश्या वाटणार या विषयी येथील नागरिक शंका व्यक्त करत आहेत. जन्मदर कमी झाल्याने येथे सरकार मुले सांभाळणाऱ्या पालकांना अनेक प्रकारच्या सबसिडी देत असून चाईल्ड केअर सेवा पूर्वीच सुरु करण्यात आली आहे.

Leave a Comment