दूरचित्रवाणीवरुन गायब झाले ‘नमो टीव्ही’


नवी दिल्ली – 17 व्या लोकसभा निवडणुका संपताच टीव्हीवरुन वादग्रस्त ‘नमो टीव्ही’ हे चॅनल गायब झाले आहे. केवळ भाजपशी संबंधित कार्यक्रम ‘नमो टीव्ही’वरून प्रसारित केले जात होते. भाजपकडून या चॅनलला निधी पुरवठा होत असल्याचा आरोप सातत्याने झाला होता. पण या चॅनलचे प्रसारण लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबताच बंद झाले आहे.

नमो टीव्हीची लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अचानक सुरू झालेले हे चॅनल सुरूवातीपासूनच वादात अडकले होते. या चॅनलवर केवळ भाजपशी संबंधित कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणे व सभा दाखवल्या जात होत्या.

नमो टीव्हीवर रेकॉर्डेड शो दाखविण्यास आयोगाने मतदानाच्या ४८ तास आधी मनाई केली. पण निवडणुकीचे थेट प्रक्षेपण दाखविण्यास नमो टीव्हीला परवानगी दिली होती. आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना नमो टीव्हीवरील प्रसारणावर लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले होते. तसेच या चॅनलेचे मॉनिटरींग करण्याचेही आदेश देण्यात आले होते. यापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विना परवानगी कोणताही कार्यक्रम नमो टीव्हीवर दाखविण्यास मनाई केली होती. नमो टीव्ही भाजप चालवत असून त्यामुळे या टीव्हीवरील सर्व रेकॉर्डेड कार्यक्रम विना परवानगी दाखविता येणार नाही, असे आयुक्तांनी म्हटले होते. या चॅनलवरून परवानगी शिवाय दाखविण्यात येणारा सर्व कंटेन्ट हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते.

त्याचबरोबर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे चॅनल बंद करण्याची मागणी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली होती. आयोगाने त्यानंतर नमो टीव्हीवरुन मंत्रालयाकडे अहवाल मागून एक नोटीस जारी केली होती. आता हे चॅनल मतदान झाल्यानंतर लगेचच अचानक गायब झाल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे.

Leave a Comment