माही बॅट टाकून हातात घेणार कुंचला


भारताला दोन विश्वकप मिळवून देणारा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी उर्फ माही क्रिकेट मधून सन्यास घेणार असल्याची चर्चा वारंवार केली जात असतानाच खुद्द माहीने तसे संकेत दिले आहेत. इंग्लंड मध्ये होत असलेल्या वर्ल्ड कप नंतर माही क्रिकेटचा निरोप घेईल असा अंदाज वर्तविला जात असतानाच माहीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर तो काय करेल याचे संकेत दिले आहेत.

माही म्हणतो, बालपणापासून चित्रकार, पेंटर बनायचे स्वप्न मी पाहत आलो आहे. धोनीने त्याने केलेली काही पेंटिंग शेअर केली आहेत. व्हीडोओ मध्ये तो म्हणतो, मला एक गुपित तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे. क्रिकेट मी खूप खेळलो आता मला जे हवे ते करण्याची वेळ आली आहे. मी काही पेंटिंग बनविली आहेत. आणि माझे हे लहानपणापासूनचे स्वप्न आहे.


३७ वर्षीय धोनी पुन्हा एकदा वर्ल्ड कप मध्ये त्याचे कर्तृत्व दाखविण्यास सज्ज असला तरी त्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. कसोटी मधून त्याने २०१४ मध्ये निवृत्ती घेतली आहे. धोनीने त्याची जी पेंटिंग शेअर केली आहेत त्यात पहिले निसर्गचित्र आहे, दुसरे पेंटिंग म्हणजे धोनीच्या मते भविष्यातील वाहन असू शकते. यातील तिसरे आणि धोनीला आवडलेले पेंटिंग त्याचे स्वतःचेच चित्र असून त्यात तो आयपीएल चेन्नई सुपरकिंग्सची जर्सी घालून खेळताना दिसतो आहे.

धोनी त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरविणार असून टीकाकार, तज्ञ लोकांनी त्याला त्याबाबत सूचना आणि सल्ले द्यावे अशी त्याची अपेक्षा आहे.