असे आहे ७ लोककल्याण मार्ग, पंतप्रधान निवासस्थान


२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील आणि नवे पंतप्रधान कोण याची उत्सुकता संपेल. पुढची ५ वर्षे ७ लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी कोण राहायला जाणार हेही त्यावेळी स्पष्ट होईल. दिल्लीच्या लुतीयान झोन मधील ७ लोककल्याण मार्ग म्हणजे पूर्वीचा ७ रेसकोर्स रोड. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे २०१४ पासून येथे राहत आहेत.


हे पंतप्रधान निवासस्थान १२ एकर जागेत पसरले असून येथे १ नाही तर ५ बंगल्यांच्या समूह आहे. या संपूर्ण भागाला ७ लोककल्याण मार्ग म्हटले जाते. १९८० साली ही वास्तू बांधली गेली असून येथे वास्तव्य करणारे पहिले पंतप्रधान होते राजीव गांधी. या बंगल्याचे नकाशे रोबर्ट रसेल यांनी तयार केले होते.१९२० ते १९३० या दशकात नवी दिल्ली नगररचना नकाशा तयार करणारे सर एडविन लुटीयंस यांच्या टीमचे रसेल सदस्य होते. या संकुलात पंतप्रधान निवासस्थान, कार्यालय, सुरक्षा प्रतिष्ठान, एसपीजी, गेस्ट हाउस असे पाच बंगले आहेत. या बंगल्यांना १,३,५,७ आणि ९ असे नंबर असून ५ नंबरमध्ये मोदी राहतात.


७ नंबर बंगला पंतप्रधान कार्यालयाचा आहे. ९ नंबर मध्ये एसपीजी निवासस्थान असून ३ नंबरमध्ये गेस्ट हाउस आहे. नंबर १ हेलीपॅड आहे. हे बंगले आकाराने फार मोठे नाहीत. डायनिंग ड्रॉइंग सह दोन बेडरूम असा त्यांचा विस्तार आहे. येथूनच सफदरजंग विमानतळाला जोडणारे २ किमी लांबीचे भुयार असून त्याचे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले. याचा वापर करणारे पहिले पंतप्रधान मोदी हेच आहेत. बंगल्याभोवती मोठी बाग असून मोर आणि अन्य अनेक प्रकारचे पक्षी येथे आहेत. एसपीजी सुरक्षा असलेले हे एकमेव निवासस्थान आहे.

पंतप्रधान भेटीसाठी येणाऱ्याना ९ लोककल्याण मार्गावरून प्रवेश दिला जातो. त्यापूर्वी भेटीची वेळ घेतलेली असणे आवश्यक असून कडक सुरक्षा तपासणी नंतर आत प्रवेश मिळतो. पंतप्रधानांचे नातेवाईक सुद्धा याला अपवाद नाहीत. भेटीला येताना ओळखपत्र आवश्यक असते. हा सारा परिसर नो फ्लाय झोन आहे. या निवासस्थानाचे स्वतःचे पॉवर स्टेशन आहे तसेच चोवीस तास एम्स मधील डॉक्टर आणि नर्स येथे तैनात असतात. या आवारात चित्रपट पाहण्याची सुविधा आहे.

Leave a Comment