हुवावेवर बंदीमुळे अमेरिकेचे ७७ हजार कोटींचे नुकसान


चीनी टेलिकॉम कंपनी हुवावे मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे कारण देऊन अमेरिकेने हुवावेला ब्लॅकलिस्ट यादीत टाकून कंपनीवर प्रतिबंध लागू केले असल्याने हुवावेचे नुकसान होणार आहेच पण अमेरिकेतील कंपन्यांनाही ११ अब्ज डॉलर्स म्हणजे ७७ हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणर असल्याचे सांगितले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हुवावे जगातील सर्वात मोठी टेलिकॉम उपकरणे उत्पादक आणि जगातील दोन नंबरची स्मार्टफोन विक्री करणारी कंपनी आहे आणि ही कंपनी त्यांना आवश्यक असलेले अनेक सुटे भाग प्रमुख अमेरिकन कंपन्यांकडून विकत घेते.

अमेरिकन मिडियाने दिलेल्या माहितीनुसार हुवावेने गतवर्षी अमेरिकेतील १३ हजार सप्लायर्स कडून ७० अब्ज डॉलर्सचे सुटे भाग खरेदी केले होते. त्यातील ११ अब्ज डॉलर्स किमतीचे सुटे भाग क्वालकॉम, मायक्रोसॉफ्ट, ब्रॉडकॉम, गुगल अश्या बड्या कंपन्यांकडून घेतले होते. या सर्व कंपनांचे हुवावे वर लादण्यात आलेल्या प्रतीबंधांमुळे नुकसान होणार आहे.


अमेरिकेने १५ मे रोजी हुवावेला एनटीटइ लिस्ट म्हणजे अमेरिकन सरकारच्या परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्याकडून सुटे भाग खरेदी अथवा तंत्रज्ञान खरेदी करण्यास प्रतिबंध असलेल्या यादीत समाविष्ट केले आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी या संदर्भात सांगितले कि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्या देशातील कंपन्यांनी अमेरिकन कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करावा अशी इच्छा नाही. हुवावे कंपनीकडून हेरगिरीचा धोका आहे असे त्यांचे म्हणणे आहे.


अमेरिकेने त्याच्या सहयोगी देशांनी ५ जी साठी हुवावे नेटवर्कचा वापर करू नये असे सांगितले आहे. अमेरिका आणि चीन मधील व्यापार युद्ध अधिक तीव्र बनले असून गेल्या वर्षी अमेरिकेच्या सांगण्यावरून हुवावेच्या सीएफओ मेंग वान्ग्झू यांना कॅनडात अटक केली गेली होती. त्या सध्या जामिनावर असून अमेरिका त्यांचे प्रत्यार्पण करावे यासाठी प्रयत्नशील आहे.

Leave a Comment