लोकसभा निवडणूक खर्चाने अमेरिकन निवडणुकीला टाकले मागे


जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात यंदा लोकसभेसाठी १७ वी सार्वजनिक निवडणूक पार पडली असून या निवडणुकीने खर्चाचे नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. त्याअर्थी ही जगातील आत्तापर्यंतच्या निवडणुकीतील सर्वात खर्चिक निवडणूक ठरली आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मिडिया स्टडीज ने सात टप्प्यात पार पडलेल्या या निवडणुकांसाठी ७ अब्ज डॉलर्स म्हणजे ५० हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. ओपन सिक्रेट ओआरसी नुसार २०१६ मध्ये अमेरिकेत पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकांसाठी ६.५ अब्ज डॉलर्स खर्च आला होता.

सेंटर फॉर मिडिया स्टडीजच्या आकडेवारीनुसार भारतात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकात ५ अब्ज डॉलर्स खर्च झाले होते त्यातुलनेत यंदाच्या निवडणूक खर्चात ४० टक्के वाढ झाली आहे. भारतात आजही सर्वसामान्य जनतेचे दरडोई उत्पन २१० रुपयाच्या आत असताना निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारामागे येणारा खर्च सरासरी ५०० रुपयांपेक्षा अधिक आहे. २०१४ निवडणुकात सोशल मिडीयावर झालेला खर्च २५० कोटी होता तो यंदा ५ हजार कोटींवर गेला आहे. झेनिथ इंडियाच्या अनुमानानुसार नुसत्या जाहिरातींचा खर्च २६ अब्ज रुपये आहे.


निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार २०१४ मध्ये प्रमुख दोन पक्षांच्या जाहिरातींचा खर्च १२ अब्ज रुपये होता. राज्यांच्या हिशोबाने लोकसभेत प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची लिमिट ठरते. गोवा, अरुणाचल, व दिल्ली सोडून अन्य केंद्रशासित प्रदेशांसाठी ही सीमा ५४ लाख आहे तर बाकी राज्यांसाठी ती ५० ते ७० लाख आहे. विधानसभेसाठी खर्चाची मर्यादा २० ते २८ लाख रुपये आहे.

आकडेवारी सांगते भारताच्या पहिल्या तीन निवडणुकांसाठीचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी होता. १९८४-८५ मध्ये आठव्या लोकसभा निवडणुकात तो १०० कोटींवर गेला तर १९९६ च्या अकराव्या लोकसभेसाठी तो प्रथमच ५०० कोटींवर होता. २००४ च्या १५ व्या लोकसभा निवडणुकीत तो १ हजार कोटींवर तर २०१४ च्या निवडणुकीत हाच खर्च ३८७० कोटी रुपयांवर पोहोचला होता.

Leave a Comment