रुद्र गुहेत तुम्हीही करू शकता ध्यानधारणा


रविवारी लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडण्यापूर्वी शुक्रवारी प्रचार थंडावला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट केदारनाथाच्या दरबारी पोहोचल्याचे फोटो सोशल मिडीयावर झळकले. त्याचबरोबर मोदींनी केदारनाथ मंदिरापासून २ किमी अंतरावर पहाडात बांधलेल्या रुद्र गुहेत १७ तास ध्यानधारणा केल्याच्या बातम्याही आल्या. विशेष म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या या गुहेत सर्वसामान्य कुणीही ध्यानधारणेचा अथवा एकांताचा अनुभव घेऊ शकतो आणि मोदी यांच्यापूर्वी महाराष्ट्रातील जय शहा यांनी ९ ते ११ मे या काळात या गुहेत वास्तव्य केले असल्याचे समजते.


मंदाकिनी नदीच्या काठी उंच पहाडात असलेली ही गुहा नैसर्गिक नाही तर केदारनाथ सुशोभिकरण प्रकल्पानुसार नेहरू पर्वतारोहण संस्थान अश्या ५ गुहा पर्यटकांसाठी तयार करणार आहे. त्यातील ही पहिली गुहा असून ती समुद्रसपाटीपासून १२५०० फुट उंचावर आहे. ५ मीटर लांब आणि ३ मीटर रुंदीच्या या गुहेत वीज, फोन, हिटर, बेड्स, वॉशरूम अश्या मुक्कामासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत. तीन दिवसांसाठी कुणालाही या गुहेचे बुकिंग करता येते. त्यासाठी रोज ९९० रु. चार्ज भरावा लागतो. गढवाल मंडळ विकास निगम तर्फे हे बुकिंग होते. गुहेत जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीची प्रथम गुप्त काशी येथे वैद्यकीय तपासणी होते व त्यानंतर केदारनाथ येथेही वैद्यकीय तपासणी केली जाते.


मोदी यांनी या एकांतातील गुहेत १७ तास काढले आणि तेथून परतताना ते बर्फाळ रस्त्यावरून पायी मंदिराकडे आले. ध्यानधारणेसाठी जाण्याची मोदींची ही पहिली वेळ नाही. गुजराथचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी केदारनाथच्या गरुडचट्टी येथे दीर्घकाळ अध्यात्मसाधना केली होती. रुद्र गुहेतील साधनेनंतर बोलताना मोदी म्हणाले, ईश्वराच्या दारात येऊन मी काहीही मागत नाही कारण मागण्याची प्रवृत्ती मला मान्य नाही. ईश्वराने तुम्हाला मागण्यासाठी नाही तर काही देण्यासाठी योग्य बनविले आहे. रुद्र गुहेत संपूर्ण जगापासून विरक्त असा काळ व्यतीत करता आला. तेथून एका छोट्या खिडकीतून केदारनाथाचे मंदिर दिसत होते. हा निवासाचा काळ मनाला खूप शांतता देऊन गेला.

Leave a Comment