या एका आंब्यासाठी मोजावे लागतात ५०० रुपये


अफगाणिस्थानचे मूळ असलेल्या नूरजहान या जातीच्या आंब्याची मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्यात असलेली मोजकी झाडे यंदा चांगलीच बहरली असून त्यामुळे नूरजहान आंबा शौकीन खुशीत आले आहेत. देशातील हा एकमेव असा आंबा आहे ज्याच्यासाठी तो झाडावर पिकण्याअगोदरच त्याचे बुकिंग केले जाते. उत्तम प्रतीच्या आंब्याला प्रचंड भाव येतो आणि एक आंबा खरेदी करायचा तर ५०० रुपये मोजावे लागतात. अर्थात पैसे मोजूनही आंबा मिळेल याची खात्री नसते कारण या आंब्याचे उत्पादन खूपच मर्यादित आहे.

अलीराजपूर जिल्यात कठ्ठीवाडा भागात या जातीच्या आंब्याची ८ झाडे आहेत. पूर्ण वाढलेला आंबा १ फुट लांब आणि दोन ते अडीच किलो वजनाचा असतो. त्याच्या कोयीचे वजन १५० ते २०० ग्राम भरते. विशेष म्हणजे या क्षेताबाहेर या आंब्याची रोपे जगू शकत नाहीत. त्यामुळे अन्य कुठे त्याची लागवड होऊ शकलेली नाही. जानेवारी मध्ये झाडे मोहरतात आणि जून मध्ये आंबा तयार होतो. गेल्या वर्षी मोहोर पूर्ण गळून गेल्याने हा आंबा मिळू शकला नव्हता. यंदा मात्र पोषक हवामान राहिल्याने झाडे आंब्यांनी लगडली आहेत.


असे सांगतात राजपरिवारातील स्वर्गीय राजे पवनेन्द्रसिंग उर्फ पोपोबाबा यांनी १९७० च्या दशकात नूरजहान आंब्याचे रोप गुजराथ मधून नानले होते आणि १० वर्षानंतर त्याच्यापासून दुसरे झाड तयार केले गेले. पूर्वी या आंब्याचे वजन साडेतीन ते पावणेचार किलोच्या दरम्यान भरत असे पण गेल्या दशकात हवामानात बदल झाला. कधी मान्सून उशिरा, कधी पाउस नाही तर कधी अतिवृष्टी यामुळे आंब्याच्या वजनात घट झाली आहे. लहान बाळ सांभाळावे तशी या आंब्याची देखभाल करावी लागते.

कृषीतज्ञांच्या मते हा आंबा हाथीझूल प्रजातीचा असून तो बुंदेलखंड आणि बघेलखंड येथे पिकतो. १९९९ व २०१० साली त्याला किंग ऑफ मँगो आणि नॅशनल अॅवॉर्ड दिले गेले आहे. हा आंबा पिकला कि लवकर खराब होतो असेही समजते.

Loading RSS Feed

Leave a Comment