अजय देवगण सिनेमा हॉलमध्ये करणार ६०० कोटींची गुंतवणूक


बॉलीवूड मधील सध्याचे स्टार भविष्यासाठी गुंतवणूक करण्याबाबत अधिक जागरूक झालेले दिसत असतानाच अजय देवगण मागे राहिलेला नाही. त्याने देशात २५० चित्रपटगृहे उभारण्यासाठी ६०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून एनवाय या नावाने ही मल्टीप्लेक्स सुरु केली जाणार आहेत. एनवाय हे त्याची मुलगी न्यासा आणि मुलगा युग यांच्या नावातील पहिली अक्षरे घेऊन बनविलेले नाव आहे. एनवाय सिनेमा अंतर्गत येत्या पाच वर्षात देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात ही मल्टीप्लेक्स सुरु केली जाणार आहेत.

एनवाय व्हेन्चरचे पहिले मल्टीप्लेक्स मध्यप्रदेशातील रतलाम येथे सुरु केले जाणार आहे. अजयने यापूर्वी उत्तरप्रदेशातील हापुड आणि गाझीपुर येथे दोन सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे खरेदी केली आहेत. अजयने नवीन गुंतवणुकीविषयी पूर्ण योजनेचा खुलासा केलेला नाही.

मात्र एनवाय सिनेमाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव शर्मा म्हणाले देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरात ही चित्रपटगृहे सुरु केली जातील. तेथे मल्टीप्लेक्सची संख्या अगदी कमी आहे अथवा अजिबात नाही. एनवाय सिनेमाने नुकताच एलन ग्रुपबरोबर सौदा केला असून गुरूग्राम शॉपिंग मॉल मध्ये ५ स्क्रीन सुरु केले जात आहेत. या मॉलसाठी ४५० कोटी रुपये खर्च येणार असून एनवायचे उत्तर भारतातील हे पहिले डील आहे.

एलन ग्रुप गुरुग्राममध्ये ७.५ लाख चौरस फुट एरियात एलन एपीन नावाने लक्झरी रिटेल प्रोजेक्ट उभारत असून त्यात ५ सिल्व्हर स्क्रीन आहेत. त्यासाठी ४६ हजार चौरस फुट जागा वापरली जाणार आहे.

Leave a Comment