गुवाहाटी बॉम्बस्फोटप्रकरणी टीव्ही अभिनेत्रीला अटक


नवी दिल्ली – टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आणि तिच्या साथीदाराला गुवाहाटीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींची जान्हवी साइकिया आणि प्रनॉमॉय राजगुरु अशी नावे असून युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेशी ते दोघेही संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

बुधवारी संध्याकाळी गुवाहाटीत एका शॉपिंग मॉलसमोर आणि शहराच्या मध्य भागातील बागेसमोर बॉम्बस्फोट झाला होता. हे स्फोट ग्रेनेड फेकून घडवण्यात आले होते. हे स्फोट मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी घडवले होते. ११ जण या स्फोटात जखमी झाले होते. गुवाहाटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून पोलिसांनी या स्फोटांप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले की, गुवाहाटीतील बाघोरबारी येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. राजगुरु आणि जान्हवी या दोघांनी हे घर भाड्याने घेतले होते. स्फोटक पदार्थ या घरातून जप्त करण्यात आले. २० किलो गनपावडर, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य, ९ एमएम पिस्तूल आणि ‘उल्फा’शी संबंधित कागदपत्रांचा यात समावेश आहे.

१९८६ पासून राजगुरु हा उल्फासाठी काम करतो, तर त्याला जान्हवी मदत करते, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. ‘उल्फा’साठी दोघेही काम करत होते. संघटनेच्या वरिष्ठांकडून त्यांना आदेश यायचे आणि त्याची दोघेही अंमलबजावणी करायचे. दोघांचा बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटामागे हात असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे, असे दीपक कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment