मुक्ता बर्वेच्या बंदीशाळाचे पहिले पोस्टर रिलीज


राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले संजय कृष्णाजी पाटील हे ‘बंदिशाळा’ हा नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संजय कृष्णाजी पाटील यांनीच एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथाही लिहिली असून कादंबरी बाहेरील विषयाला त्यांनी पहिल्यांदाच हात घातला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने या चित्रपटाची रिलीजपूर्वीच कान्ससाठी निवड झाली असून या चित्रपटाला ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शनाच्या घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे ही ‘बंदिशाळा’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. हा एक सामाजिक चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. या चित्रपटातून एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याची कथा उलगडणार आहे. या चित्रपटात माधवी सावंत या महिला तुरुंग अधिकाऱ्याची मुक्ताने भूमिका केली असून ही आजवरची आपल्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचे तिने म्हटले आहे.

या चित्रपटात मुक्ताव्यतिरिक्त विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमंगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके आणि राहुल शिरसाट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुणे शहर, पुणे ग्रामीण, भोर तालुका, मुंबई अशा ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment