विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला अनिल गोटेंचा राजीनामा


मुंबई – आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केल्यानंतर हा राजीनामा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. गोटे यांचा राजीनामा स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध बंडखोरी करत धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी उमेदवारी केली होती. अनिल गोटे हे धुळे महापालिका निवडणुकीपासून नाराज होते. लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. तसेच भाजपच्या सदस्यत्वाचा देखील त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यावर भाजपनेदेखील कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली होती. पण आता अनिल गोटे यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी देखील स्वीकारला आहे.

लोकसभेपूर्वी अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे. दरम्यान, ज्या आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी करतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment