ममता बॅनर्जींनी लक्ष्य करण्यासाठीच बंगालमधील राडा – मायावती


लखनऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये राडा घडवला असल्याचे स्पष्ट असून निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि अन्यायकारक आहे. पंतप्रधानपदाला अशाप्रकारचे राजकारण शोभणारे नसल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपवर केला आहे.

मायावती यावेळी बोलताना म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील राड्यानंतर येथे एक दिवस आधीच प्रचारबंदी केली. पण रात्री 10 वाजेर्यंत हा प्रचार ठेवण्यात आला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये दोन सभा होणार आहेत. निवडणूक आयोगाला जर प्रचारबंदी करायची होती, तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय केल्याचा आरोपही मायावती यांनी केला आहे.

मथुरापूर आणि डायमंड हार्बर येथे प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची निवडणूक रॅली होणार आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी कोलकाता ते जाका आणि सुकांता सेतु या मार्गावर पदयात्रा काढणार आहेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील मथुरापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर डमडम येथेही संध्याकाळी मोदींची सभा होणार आहे. भाजपने 23+ जागांचे टार्गेट बंगालमध्ये ठेवले असल्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण आज ढवळून निघणार आहे.

येत्या रविवारी बंगालमधील डमडम, बारासात, बशिरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण व कोलकाता उत्तर या नऊ ठिकाणी मतदान आहे. तिथे प्रथेप्रमाणे प्रचार त्याच्या ४८ तास आधी म्हणजे १७ मे रोजी सायंकाळी बंद होणार होता. पण आता १६ मेच्या (गुरुवार) रात्री १० पासूनच येथील जाहीर प्रचार बंद करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जाहीर प्रचाराखेरीज कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित करण्यास तेव्हापासून प्रतिबंध असेल. तसेच सर्व ठिकाणी गुरुवारच्या रात्रीपासून संपूर्ण दारूबंदीही लागू होईल.

Leave a Comment