व्हॉट्सअॅपकडून यूझर्सना अॅप अपडेट करण्याच्या सूचना


मुंबई : सध्याच्या घडीला तुमच्या आमच्या सर्वांच्याच गळ्यातील ताईत असलेले व्हॉट्सअॅप हॅकर्सच्या निशाण्यावर आले असल्यामुळे व्हॉट्सअॅपकडून जगभरातील यूझर्सना अॅप अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजकाल बऱ्याच जणांचे व्हॉट्सअॅपवाचून पान हलत नाही. पण हॅकर्सची वक्रदृष्टी या व्हॉट्सअॅपवर पडल्यामुळे अनेक यूझर्स चिंताग्रस्त झाले आहेत.

तुमच्या स्मार्टफोनमधील सगळी माहिती, फोटो, व्हिडिओ एका व्हॉईसकॉल सरशी हॅकरच्या हाती जाण्याची शक्यता आहे. एक कोड इस्रायली सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओ ग्रुपने डेव्हलप केला आहे. व्हॉट्सअॅप अकाऊंट या कोडच्या मदतीने हॅक करणे सोपे झाल्याची माहिती ‘द फायनान्शिअल टाईम्स’ या वृत्तपत्राने दिली आहे. पण हॅकिंगचे वृत्त एनएसओ ग्रुपने फेटाळले आहे.

पेगासस सॉफ्टवेअर एनएसओ कंपनी वापरत असल्यामुळे कुठल्याही स्मार्टफोनमधील संभाषण, कॅमेरा आणि लोकेशनची माहिती मिळवणे त्यांना शक्य आहे. तरी डेटा हॅकिंग नाही तर डेटा सुरक्षेवर आपण लक्ष देत असल्याचे एनएसओ कंपनीने स्पष्ट केले आहे. शिवाय यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासनही दिले आहे.

आता फेसबुककडे व्हॉट्सअॅपची मालकी असून त्यातच डेटा लीकचे ग्रहण फेसबुकला लागले आहे. ते नीट सांभाळण्यात फेसबुकच्या नाकीनऊ येत असतानाच आता त्यांच्याच मालकीच्या व्हॉट्सअॅपच्या डेटा सुरक्षेवर मोठे संकट उद्भवले आहे. डेटा हॅकची माहिती व्हॉट्सअॅपला कळताच त्यावर त्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या. अॅप अपडेट करण्याच्या सूचना जगभरातील यूजर्सना देण्यात आल्या आहेत. हा लूपहोल अपडेटमध्ये फिक्स करण्यात आल्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे अँड्रॉईड, अॅपल, विंडोज, गूगल यापैकी कुठल्याही सिस्टमचा स्मार्टफोन असला, तरी त्यातील व्हॉट्सअॅप तात्काळ अपडेट करा, अन्यथा एक कॉल येईल आणि तुमचे व्हॉट्सअॅप हॅक होईल.

Leave a Comment