स्वतःच अग्नीस्नान करणारी चमत्कारी इडाना माता


भारतात देवीमहात्म्य मोठे आहे आणि त्यामुळे देशभर लाखोनी देवी माता मंदिरे आहेत. अनेक देवळे तेथे तेवणाऱ्या अखंड ज्योतीसाठी प्रसिद्ध आहेत मात्र राजस्तानच्या मेवाड भागातील प्रमुख शक्तीपीठ चमत्कारी इडाना माता मंदिराची कहाणी अद्भुत आहे. येथे देवीचे मंदिर नाही तर वडाच्या झाडाखाली प्रकट झालेली स्वयंभू मूर्ती आहे. ही देवी स्वतः अग्निस्नान करते आणि अग्नीच्या तांडवात देवीला वाहिलेली वस्त्रे जाळून खाक होतात मात्र देवीच्या मूर्तीला त्याची कोणतीही झळ बसत नाही इतकेच नव्हे तर येथील तेवणारा दिवाही तसाच असतो. हा देवीचा चमत्कार मानला जातो.

उदयपुरपासून ६० किमी अंतरावर कुरबद बम्बोरा मार्गावर आरवली पहाडात हे प्रमुख शक्तीपीठ आहे. याची कथा अशी सांगतात, ही देवी वडाच्या झाडाखाली प्रकट झाली आणि तिने एका साधूला कन्या रुपात दर्शन देऊन येथेच तपस्या करण्याची आज्ञा दिली. या साधूने तपश्चर्या सुरु केली तेव्हा सारखे चमत्कार होऊ लागले. आंधळ्यांना दृष्टी आली, लकवा झालेल्यांचे अपंगत्व गेले, ज्यांना अपत्य नव्हते त्यांना अपत्य प्राप्ती झाली.


हळू हळू या स्थानाची प्रसिद्धी आसपास होऊ लागली आणि अनेक भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी नवस बोलू लागले आणि नवस फळू लागले. भाविक देवीला चुनरी वाहतात आणि ज्यांनी अपत्य प्राप्तीसाठी नवस केला ते पाळणा वाहतात. असे सांगतात देवीला नवसाच्या या वस्तूंचे ओझे झाले कि महिन्यातून दोन तीन वेळा अचानक आग भडकते आणि त्यात हे नवसाचे कपडे जाळून खाक होतात. आगीच्या ज्वाला १०- २० फुटांवर जातात पण देवीच्या मूर्तीला काहीही इजा होत नाही. तसेच देवीला वाहिलेल्या शृंगार सामग्रीचे कोणतेही नुकसान होत नाही. येथे नवस पूर्ण झाला कि त्रिशूल वाहण्याची प्रथा असून देवीच्या मूर्तीमागे अनेक त्रिशूल दिसतात. महिन्यातून दोन तीन वेळा येथे अग्नी प्रकट होत असल्याने येथे मंदिर बांधले गेलेले नाही मात्र धर्मशाळा व अन्य इमारती आहेत.

Leave a Comment