विंगकमांडर अभिनंदन यांचा आगळा सन्मान


पाकिस्तानी एफ १६ आपल्या मिग २१ बायसन मधून पाडून आणि पाकिस्तानच्या ताब्यात सापडूनही सुखरूप परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन याच्या शौर्याचे कौतुक भारत सरकार योग्य रीतीने करेलच पण त्याअगोदरचा त्यांच्या बहादुरीचा सन्मान ते ज्या युनिटमध्ये तैनात होते त्या स्क्वाड्रन ५१ने खास पद्धतीने केला आहे. अभिनंदन यांना युद्ध क्षेत्रातला परमवीर आणि महावीर चक्र नंतरचा तिसरा महत्वाचा वीरचक्र पुरस्कार देण्यासाठी शिफारस झाली आहेच पण त्यापूर्वीच त्यांच्या स्क्वाड्रनने युनिफॉर्मवर लावण्यासाठी खास पॅच तयार करून अभिनंदन याच्या शौर्याचा गौरव केला आहे. हा पॅच स्क्वाड्रनचे सर्व मिग २१ बायसन पायलट त्यांच्या जी सूटवर लावणार आहेत.


स्क्वाड्रन ५१ यापूर्वी स्वार्ड आर्म या नावाने ओळखली जात होती आता तिचे नाव बदलून फाल्कन स्लेयर्स असे केले गेले आहे. नव्या पॅचवर हे नाव आहे. या पॅचवर पाकचे एफ १६ विमान मिग २१ बायसनने भेद्ल्याचे चित्र आहे. फाल्कन हे पाक एफ १६ चे नाव असून फाल्कन स्लेयर्स याचा अर्थ फाल्कनला भेदणारा असा आहे. या सोबत एमराय डोजर्स अशीही अक्षरे या पॅचवर आहेत. पाक एफ १६ विमाने इम्राय या मिसाईलने युक्त असून अभिनंदन याच्या विमानावर हे मिसाईल डागले गेले होते. एमराय डोजर्सचा अर्थ एमराय मिसाईलला चकवा देणारा असा आहे.


पुलवामा हल्ला, त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेली बॉम्बफेक आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी एफ १६ लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा केलेला प्रयत्न, त्यांना पिटाळून लावताना मिग २१ बायसन पायलट विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग २१ मधून पाडलेले पाकचे एफ १६ विमान, तसेच त्या प्रयत्नात पाकिस्तान हद्दीत पडलेले मिग २१ आणि पायलट अभिनंदन यांना पाक लष्कराने पकडणे व ६० तासांनंतर त्यांची सुखरूप झालेली सुटका हा एखाद्या थरार चित्रपटाचा विषय होऊ शकतो. अभिनंदन याच्या अतुल शौर्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या युनिटने नवा पॅच वापरणे हा त्याचाच एक भाग आहे. हवाई दलातील अधिकारी या संदर्भात म्हणाले कोणतेही स्क्वाड्रन त्यांचे यश, सफलता दर्शविण्यासाठी या प्रकारचे शोल्डर पॅच वापरू शकतात. जगभरात ही पद्धत आहे मात्र भारतीय हवाई दलाने ते प्रथमच वापरले आहेत.

Leave a Comment