मुंबई इंडियन्सना अँटेलिया मध्ये नीता अंबानींची पार्टी


आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालक नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी टीमच्या विजयाचे सेलेब्रेशन दणक्यात केले असून मुंबई इंडियन्सचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंचे कुटुंबीय अश्या सर्वांसाठी अंबानींच्या जगातील सर्वात महागडे घर अशी प्रसिद्धी मिळविलेल्या अँटेलिया मध्ये शानदार पार्टी दिली. आयपीएलच्या १२ व्या सत्रात हैद्राबाद येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सवर १ धावेने विजय नोंदवून चौथ्या वेळी आयपीएल करंडक जिंकण्याचा विक्रम नोंदविला असून त्याचा आनंद अंबानी कुटुंबीयांनी या प्रकारे साजरा केला.


सोमवरी सायंकाळी झालेल्या या शानदार पार्टीच्या अगोदर विजयी संघाची मुंबईच्या रस्त्यांवरून उघड्या बस मधून मिरवणूक काढली गेली. यात नीता आणि आकाश दोघेही खेळाडूंसोबत याच बस मध्ये होते. रस्त्याच्या दुतर्फा ही मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. ६ किमीच्या या मिरवणुकीत लोकांना खेळाडूंनी अभिवादन केले.


त्यानंतर अंबानीच्या घरी पार्टीची सुरवात झाली. मुंबई इंडियन्सने विजय नोंदविल्यावर नीता अंबानी यांनी श्रीकृष्णाला या विजयाचे श्रेय दिले होते आणि दोन दिवसांनी मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. नीता आणि आकाश यांनी खेळाडूंचे अँटीलीया मध्ये स्वागत केले आणि कप्तान रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांनी ट्रॉफीसह फोटो काढले. पार्टीसाठी आणला गेलेला केक हार्दिक पंड्या याने कापला.