काही झाले तरी मोदीजींच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही – राहुल गांधी


उज्जैन – सध्या विविध ठिकाणी सभांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह गांधी कुटुंबीयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते हल्ले चढवत आहेत. विरोधकांकडून एकाच परिवाराचे राजकारण आणि राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार याला लक्ष्य करण्यात येत आहे. राहुल गांधींनी या पार्श्वभूमीवर मी एकवेळ मरण पत्करेन मोदीजी, पण, मी तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही, असा टोला लगावला आहे. मध्य प्रदेशातील एका सभेत राहुल गांधी बोलत होते.

सतत द्वेषापोटी मोदीजी भाषणे करत आहेत. माझ्या आई-वडिलांचा आणि आजी-आजोबांचा ते अपमान करत आहेत. पण एकवेळ मी मरण पत्करेन, पण तुमच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मी आरएसएस किंवा भाजपचा माणूस नाही. काँग्रेसचा मी आहे. माझा मोदींनी कितीही द्वेष केला, तरी त्यांना मी द्वेषाने नाही तर प्रेमानेच उत्तर देईन आणि गळाभेट घेत प्रेमानेच पराभूत करेन, असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी यापूर्वी मोदीजी पावसामुळे लढाऊ विमाने रडारवरून गायब होतात का? असा प्रश्न विचारत खिल्ली उडवली. १२ मे रोजी एका वृत्तवाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत, एअर स्ट्राईकच्या आधी ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते. मात्र भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी, अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला दिल्याचे मोदींनी म्हटले होते. यानंतर ते सोशल मीडियावरही ट्रोल झाले होते.