चीनमध्ये प्रदर्शित होणार ह्रतिक, यामीचा ‘काबिल’


बॉक्स ऑफिसवर ह्रतिक रोशन आणि यामी गौतम यांचा ‘काबिल’ चित्रपट तुफान हिट झाला होता. ह्रतिक आणि यामी या दोघांनीही चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट आता चीनमध्येदेखील रिलीज होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चीनी पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.


आजवर भारतीय चित्रपटांना चीनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चीनी बॉक्स ऑफिसवर ‘दंगल’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘हिंदी मिडियम’, ‘हिचकी’, ‘मॉम’, ‘अंधाधून’ यांसारख्या चित्रपटांनी १०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. आता चीनमध्ये जाण्यासाठी ‘काबिल’ चित्रपटही सज्ज झाला आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा ह्रतिकचा हा पहिलाच चित्रपट आहे.


भारतात ‘काबिल’ चित्रपटाने १०३.८४ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाला जोरदार टक्कर दिली होती. ‘काबिल’ चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले होते. या चित्रपटाचे चीनी भाषेतले पोस्टर सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले आहे. हा चित्रपट चीनमध्ये ५ जून २०१९ रोजी रिलीज होईल. या चित्रपटाला आता चीनी प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment