युएस मधील पाळीव कुत्री वापरणार तीरुपूरचे कपडे


तामिळनाडू मधील होजीयरी हब अशी ओळख मिळविलेल्या तीरुपूर मधील एका युनिटला अमेरिकन पाळीव कुत्र्यांसाठी कपडे तयार करण्याची ऑर्डर मिळाली असून ही ऑर्डर ५० हजार कपड्यांची आहे. त्यामुळे या बाबत तीरुपूरने महाबलाढ्य चीनवर मात केली आहे असे म्हणता येईल. आजपर्यंत पाळीव प्राणी कॉस्चुम तयार करण्यात चीनी बाजार जगात अग्रणी आहे. पण चीनवर अमेरिकेने घातलेल्या प्रतिबंधामुळे या क्षेत्रातील भारतीय उद्योजकांना फायदा मिळाला आहे असे समजते.

त्यामुळे उद्या अमेरिकेतील गोल्डन रिट्रीव्हर अमेरिकी रस्त्यातून मस्त हुडी घालून जाताना दिसला तर ही हुडी मेड इन तीरुपूर असू शकेल. जगभरात महिला, पुरुष आणि लहान मुलांचे तीरुपूर येथून गेली अनेक वर्षे निर्यात केले जात आहेत. त्यानंतर आता जागतिक पातळीवर पाळीव प्राण्यांसाठी कपडे बनविले जात आहेत. अमेरिकेतील एका फर्मने त्याची ऑर्डर पल्लाडम युनिटला दिली आहे. असे ५० हजार कपडे अमेरिकेला निर्यात केले जाणार आहेत.


फर्म मालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी चमकदार रंगाचे स्वेटर्स सँपल पीस म्हणून पाठविले होते आणि त्याला खरेदीदारांनी त्वरित पसंती दिली. पहिली कन्साईनमेंट तीन महिन्यात रवाना केली जाणार आहे. तीरुपूरला पाळीव प्राण्यांच्या कपड्यांसाठी परदेशातून प्रथमच ऑर्डर मिळाली आहे. तीरुपूर एक्स्पोर्ट असोसिएशनचे मेम्बर कुमार दुराईसामी म्हणाले, पाश्चिमात्य देशातील खरेदीदार पाळीव प्राण्यांसाठी कपडे प्रामुख्याने चीन मधून खरेदी करतात पण अमेरिकेने चीनवर जबर कर लावल्याने भारताकडे मागणी वाढली आहे.

Leave a Comment