मनालीचा आगळावेगळा धुंगरी मेळा


भारत हा विविध संस्कृती, सभ्यता आणि चालीरीती पाळूनही एकता जपणारा देश आहे. भारताची सांस्कृतिक सभ्यता अतिशय समृद्ध आहे आणि त्यामुळेच वर्षभर देशात कुठे न कुठे काहीतरी सन, उत्सव, मेळे, जत्रा यांची दंगल उडालेली असते. अप्रतिम निसर्गासाठी प्रसिद्ध असेलेले हिमाचल त्याला अपवाद नाही. हिमाचलची राणी मनाली मध्ये सध्या असाच एक सांस्कृतिक मेळा दरवषी प्रमाणे यंदाही १४ ते १६ जून या काळात साजरा होतो आहे. आपण जर त्या भागात उन्हाळी पर्यटनासाठी गेलाच असाल तर या मेल्याची भेट चुकवू नका.


गेली अनेक शतके हा मेळा याच काळात भरतो आणि त्याचे नाव आहे धुंगरी मेला. मनालीची मुख्य देवता हिडींबा हिच्या जन्मदिवसानिमित्त हा मेळा भरविला जातो आणि त्यासाठी आसपासच्या गावातून लोक त्यांच्या गावदेवताच्या पालख्या घेऊन वाजतगाजत येथे येतात. लोकनृत्ये, लोक गीते यांची एकच दंगल उडते, विविध खेळ होतात आणि विविध रंगीबेरंगी पोशाखातील स्थानिक लोक त्यांच्या देवांची शोभायात्रा काढतात हा सगळाच सोहळा पाहण्यासारखा असतो.


हा मेळा धुंगरी हिल्सवर भरतो आणि त्याला सांस्कृतिक तसाच पौराणिक संदर्भ आहे. पांडव अज्ञातवासात असताना येथील धुंगरी अरण्यात आले होते तेव्हा येथील राजा हिडींब आणि त्याची बहिण हिडींबा त्यांना खाऊन टाकण्यासाठी जंगलात आले. मात्र कुंतीपुत्र भीमाला पाहताच हिडींबा त्याच्यावर मोहित झाली. तिने पांडवांना ठार करण्यास नकार दिला आणि भीमाने तिचा भाऊ हिडींब याला युद्ध करून ठार मारले. त्यानंतर हिडींबेने भीमाबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कुंतीने त्याला परवानगी दिली. त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला त्याने महाभारत युद्धात मोठाच पराक्रम गाजवून पांडवांना विजय मिळविण्यात सहाय्य केले होते.

भीम आणि हिडींबा यांचा आजही धुंगरी हिलवर निवास असतो अशी भाविकांची भावना आहे. त्यातून हिडींबा या भागाची देवता बनली असून तिची पूजाअर्चा करण्याची येथे प्रथा आहे. ती या साऱ्या भागाची रक्षक देवता मानली जाते. या मेळ्यात करनाल नावाचे एक खास वाद्य वाजविले जाते. आणि खास हिमाचल खाद्यपदार्थांचा आस्वाद या मेळ्यात घेता येतो.

Leave a Comment