पद्मश्री परत करणार सैफ अली खान


बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याने तो पद्मश्री या देशातील मानाच्या नागरी पुरस्कारासाठी योग्य नाही याची खात्री पटल्याने हा पुरस्कार सरकारला परत करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. अरबाज सोबतच्या एका टॉक शो मध्ये सैफला ट्रोलर कडून पाठविलेले मेसेज वाचून दाखविले गेले होते आणि त्यावर सैफने प्रामाणिक स्पष्टीकरण दिले होते. या आरोपातील पहिल्या यादीत सैफ विरुद्ध अनेक प्रश्न होते त्यात मुलाचे नाव तैमुर ठेवण्यापासून त्याला मिळालेल्या पद्मश्री संदर्भात टीका असे अनेक प्रश्न होते.

ट्रोलर्सनी सैफ हा ठग असून त्याने पदमश्री खरेदी केली असल्याचा आरोप केला होता. तसेच मुलाचे नाव तैमुर ठेवणे, एका रेस्टॉरंटमध्ये लोकांना मारहाण करणे, सुमार अॅक्टींग करुनही तरीही सिनेमात रोल मिळणे अशी अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली गेली होती. त्यावर बोलताना सैफ म्हणाला मी ठग नाही पण माझ्यावर केलेले बाकीचे आरोप खरे आहेत. मी पद्मश्री खरेदी केली नाही कारण सरकारला खरेदी करण्याची माझी लायकी नाही, ते फार महाग पडेल. सरकारला लाच देण्याची माझी हिम्मत नाही. मला पद्मश्री का दिली हे ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांनाच विचारायला हवे. त्यांनी दिली तरी मी ती घ्यायला नको होती.


या विषयी अधिक बोलताना तो म्हणाला फिल्म उद्योगात माझ्यापेक्षा लायक किती तरी लोक आहेत त्यांना हा सन्मान मिळायला हवा होता पण हेही खरे आहे की हा सन्मान अशाही अनेक लोकांना मिळाला आहे, ज्याची पात्रता माझ्यापेक्षाही कमी आहे. पद्मश्री सरकारला विनयपूर्वक परत करावी असे वाटत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला मला जेव्हा हा सन्मान जाहीर झाला तेव्हा वडिलांनी भारत सरकारच्या सन्मानाला नकार देऊ शकशील या पोझिशन मध्ये तू नाहीस असे सुनावले होते व म्हणून मी हा सन्मान आनंदाने स्वीकारला होता. त्यामुळे आता असे काही काम करावे की जेणेकरून या सन्मानासाठी मी पात्र ठरेन आणि लोकांनाही त्याबद्दल काही आक्षेप नसेल अशी इच्छा त्याने व्यक्त केली.

Leave a Comment