व्हेंडिंग मशीन मधून मिळणार शाओमीचे स्मार्टफोन


भारतात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीच्या फोन खरेदीसाठी आता ऑनलाईन सेलची प्रतीक्षा भारतीयांना करण्याची गरज उरणार नाही कारण कंपनीने मी एक्स्प्रेस कियोस्क व्हेंडिंग मशीन्स बसवीत आहे. या व्हेंडिंग मशीनमधून ग्राहक त्यांच्या पसंतीचे सर्व बजेट मधील स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. मेट्रो तिकीटासाठी जसा कियोस्कचा वापर करता येतो त्याचप्रमाणे याही कियोस्कचा वापर ग्राहक करू शकतील. या व्हेंडिंग मशीनचे डिझाईन करताना सर्व क्रेडीट, डेबिट कार्ड्स, कॅश, व युपीआय स्वीकारले जातील याची व्यवस्था केली गेली आहे. ही मशीन सर्वप्रथम मेट्रो सिटीज मध्ये बसविली जाणार आहेत.


कंपनीचे कंट्री हेड मनुकुमार जैन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, नवीन व्हेंडिंग मशीन्स ग्राहक आणि शाओमी फोनचे चाहते यांना व्हेंडिंग मशीन मधून फोन खरेदी करताना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात रिटेलमध्ये स्मार्टफोन विक्रीचे नवे धोरण विकसित केले जात आहे. व्हेंडिंग मशीन मधून फोन विक्री करणारी शाओमी भारतातील पहिली कंपनी आहेच पण हे कियोस्क भारतातच संशोधन करून विकसित करण्यात आले आहेत. या पद्धतीने ऑफलाईन मार्केटच्या माध्यमातून कंपनी त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविणार आहे.

ही व्हेंडिंग मशीन्स मेट्रो सिटीमध्ये शॉपिंग मॉल्स, एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन, टेकपार्क अश्या जागी बसविली जातील. शाओमीने नुकतेच त्यांचे रेडमी वाय ३ आणि रेडमी नोट ७ भारतात लाँच केले असून या फोन लाँचिंगच्या वेळीच मनुकुमार जैन यांनी वरील माहिती दिली. या वर्षाखेर कंपनी भारतात १० हजाराहून अधिक मी स्टोर्स सुरु करत असून त्याचा फायदा निमशहरी, छोटी शहरे आणि गावातील ग्राहकांना मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment