नव्या भारताचे असेही नवे रूप


नवा हिंदुस्थान बनतो आहे असे आजकाल आपण वारंवार ऐकतो आहोत. नव्या भारताचे आणखीही एक नवे रूप एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे आणि ते भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या बदललेल्या पद्धती हे आहे. आजकाल भारतात घरी स्वयंपाक करण्यास लोकांना वेळ मिळत नाही असे दिसून आले असून महिन्यातील सात दिवस बाहेरचे जेवण किंवा खाद्यपदार्थ यांचा समाचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले आहे. अर्थात या मागे वाढलेले आर्थिक उत्पन हे मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.


नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे भारताच्या चोवीस शहरात हे सर्व्हेक्षण केले गेले आहे आणि त्यातून भारतीयांचा हा नवा ट्रेंड समोर आला आहे. जेवण्यासाठी बाहेर जाणे याचबरोबर घरी बसून बाहेरून खाद्यपदार्थ मागविणे यात भारतीयांनी आघाडी घेतली आहे. भारतीय लोक आठवड्याला सरासरी २५०० रुपये बाहेरच्या खाण्यावर खर्च करत असून महिन्यातून किमान सात वेळा बाहेर जेवत आहेत. बाहेरचे अन्न खाणाऱ्यात रोज खाणारे ३ टक्के आहेत तर दोन ते तीन वेळा बाहेरचे अन्न खाणारयात महिलांचे प्रमाण वाढले आहे.


दर आठवड्याला बाहेर खाणारयात महिला ३७ टक्के तर पुरुष ६३ टक्के आहेत. घराबाहेर न पडता स्विगी, झोमॅटो, उबेर इटची क्रेझ खूप आहे आणि या कंपन्या घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवून जबरदस्त कमाई करत आहेत. झोमॅटो दरमहा २ कोटी १० लाख तर स्विगी दरमहा २ कोटी ऑर्डर घरपोच देत असल्याचा दावा करत आहेत. मागविल्या जात असलेल्या किंवा बाहेर जाऊन खाल्ल्या जाणाऱ्या अन्नावर होणारा सरासरी खर्च माणशी ३०० रुपये आहे. त्यातही ९० टक्के लोक कॅश देतात तर १० टक्के व्हाऊचर, क्रेडीट डेबिट कार्ड अथवा मोबाईल वॉलेटचा वापर करतात असेही दिसून आले आहे.

अजूनही ७५ टक्के लोक स्वतः बाहेर जाऊन खाण्यास, ११ टक्के फूड डिलिव्हरी तर्फे मागविण्यास तर १४ टक्के लोक अन्न बाहेरून पॅक करून नेण्यास प्राधान्य देतात असेही या सर्व्हेक्षणात समोर आले आहे. हे सर्वेक्षण १३० रेस्टॉरंट आणि ३५०० ग्राहक यांच्यावर करण्यात आले आहे.

Leave a Comment