केरळच्या त्रिसूरमधील खास शिवमंदिर


बहुतेक सर्वानाच फिरायला जायला आवडते. आजकाल पर्यटनासाठी अनेक सोयी सुविधा आहेत आणि त्यामुळे भटकंतीला निघणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. पर्यटनामागे प्रत्येकाचा वेगळा हेतू असू शकतो. कुणाला निसर्गभ्रमंती हवी असते, कुणाला साहस, कुणाला अध्यात्म तर कुणाला नुसता आनंद. केरळ राज्य पर्यटनाच्या दृष्टीने लोकप्रिय ठिकाण आहे. स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे निसर्गसौंदर्य आणि थोडे अध्यात्म असे दोन्ही हेतू ज्यांना साधायचे आहेत त्यांनी केरळच्या त्रिसूर येथील एका खास शिवमंदिराला अवश्य भेट द्यायला हवी. त्रिसूर येथील या शिवमंदिराचे नाव आहे वडक्कूमनाथन शिवमंदिर.


शहराच्या मध्य भागात असलेले हे शिवमंदिर पहाडावर असून ते हिंदूसाठी पवित्र तीर्थस्थळ असलेल्या कैलासाचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. शिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी असते पण वर्षभर भाविक येथे मुद्दाम येत असतात. या मंदिरात शिवलिंगावर तुपाने अभिषेक करण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे केरळच्या उष्ण आणि दमट हवामानात सुद्धा हे तूप वितळत नाही. शिवलिंगाचे दर्शन कुणालाच होत नाही कारण त्यावर तुपाचा दाट थर जमा झालेला असतो. त्यामुळे शिवलिंग म्हणजे तुपाचा छोटा ढीग असेच याचे स्वरूप आहे. शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन न होणारे हे एकमेव शिवमंदिर आहे.

या भागात पाउस खूप असतो आणि उन्हाळाही खूप असतो. त्यामुळे हिवाळा येथे येण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. या मंदिराशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. आदि शंकराचार्याचे हे गाव जन्मस्थळ मानले जाते. या शिवमंदिराला राष्ट्रीय वारसा यादीत स्थान दिले गेले असून येथे शंकरनारायण मूर्ती आहे जेथे शिव आणि विष्णू एकाच स्वरुपात दिसतात. मंदिराभोवती सुंदर हिरवळ आहे आणि मंदिराचा परिसर खूप मोठा आहे.


या प्राचीन मंदिराचे बांधकाम लाकूड आणि दगडात केले आहे. लाकडावर सुंदर कलाकुसर आहे. युनेस्को आशिया पॅसिफिक अॅवॉर्ड देऊन या मंदिराचा गौरव केला आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार वास्तूपुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली केला गेला असून हे काम दहा वर्षे सुरु होते. येथे त्रिसूरपूरम नावाने मोठा उत्सव साजरा होतो त्यावेळी हजारोनी भाविक येथे येतात. या उत्सवात सजविलेल्या हत्तींची मिरवणूक काढली जाते आणि शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. हे दोन्ही कार्यक्रम अतिशय प्रेक्षणीय असतात.

Leave a Comment