असे आहे आपले संसद भवन


देशात लोकसभा निवडणुका आता अखेरच्या टप्प्यात आल्या असून येत्या २३ मे रोजी निवडणूक निकाल लागण्यास सुरवात होईल आणि नवी संसद नव्याने निवडून आलेल्या खासदारांनी गजबजून जाईल. देशाचे प्रभुत्व आणि अखंडता याचे प्रतिक असलेले संसद भवन अनेक कारणांनी वेगळे आहे आणि त्याची स्वतःची काही खास वैशिष्टे आहेत. १३ मे १९५२ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले संसद सत्र सुरु झाले होते त्याला आता ६७ वर्षे पूर्ण झाली आहेत.


आपल्या संसद भवनाची इमारत गोल आकाराची आहे आणि मध्यप्रदेशातील प्राचीन चौसष्ठ योगिनी मंदिरावरून त्याचे डिझाईन केले गेल्याचा दावा केला जातो. या खास इमारतीतून संपूर्ण देशाची जबाबदारी पार पाडली जाते. संसदेचा गोल आकार हे निरंतरतेचे प्रतिक आहे. संसदेत दोन हाऊसेस आहेत, एक लोकसभा आणि दुसरे राज्यसभा. या दोन्ही भवनांचा आकार घोड्याच्या नालेसारखा आहे. लोकसभेतील जमिनीवर हिरव्या रंगाचा गालीचा आहे. आपला देश कृषिप्रधान आहे आणि हिरवा रंग खासदारांना जमिनीशी जोडणारा आहे तर राज्यसभेत लाल रंगाचा गालीचा असून त्यातून शाही भाव तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे ते प्रतिक आहे.


संसदेतील १३ नंबरची खोली राष्ट्रपतींची आहे. जगभरात १३ हा आकडा अशुभ मानला जातो मात्र भारताने या नंबरला मानाचे स्थान देऊन अंधाविश्वासाला तिलांजली दिली आहे. संसदेतील लायब्ररी प्रचंड मोठी असून जगभरातील साहित्यिक, विचारवंत यांची पुस्तके येथे आहेत तसेच निम्म्या भागात भारतीय संविधान आणि कायद्यासंबंधी पुस्तके आहेत. संसद भवनातील कॅन्टीन जगातील स्वस्त कॅन्टीनपैकी एक असून येथे सर्व पदार्थ खूपच स्वस्तात मिळतात.


ब्रिटीश वास्तूरचनाकार सर लुटीयंस आणि सर हर्बर्ट बेकर यांनी संसदेचा आराखडा तयार केला होता. या इमारतीची कोनशीला १२ फेब्रुवारी १९२१ रोजी ठेवली गेली आणि तिचे बांधकाम पूर्ण होण्यास सहा वर्षे लागली. त्यावेळी या बांधकामासाठी ८३ लाख रुपये खर्च आला होता. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ११४ खांब आहेत. इमारतीत सहा लिफ्ट आहेत आणि सर्वात अनोखे म्हणजे संसदेतील हॉलमध्ये बसविलेले पंखे उलटे आहेत. म्हणजे ते जमिनीवर खांब उभारून बसविले गेले आहेत. त्याचे डिझाईन आजही कायम ठेवले गेले आहे.

Leave a Comment