ब्रूस ली, नव्हे, हा अफगाणी अब्बास अली


मार्शल आर्टचे नाव निघाले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो मार्शल आर्ट मास्टर ब्रूस ली. अर्थात हॉलीवूड गाजविलेल्या ब्रूसचे निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे मात्र त्याची आठवण अजून बुजलेली नाही. ब्रूसची प्रतिकृती म्हणता येईल असा अफगाणी अब्बास अली हुबहु ब्रूसली सारखा दिसतोच पण तोही मार्शल आर्टमध्ये पारंगत आहे.


केवळ चेहराच नाही तर ब्रूसचे या कलेतील प्राविण्य अब्बासने मिळविले आहे. अर्थात त्यामागे अब्बासची कठोर मेहनत आहे आणि त्याने हॉलीवूड मध्ये जाण्याचे पाहिलेले स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी चिन्हे दिसत आहेत. आता त्याची ओळख ब्रूस ली ऑफ अफगाणिस्तान अशी झाली असून त्याचा अब्बासला अभिमान आहे.


अब्बास अफगाणी आहे. या मुस्लीमबहुल देशात या कलेला मान्यता नाही. अब्बासची जिद्द मात्र कायम आहे. त्याने चित्रपट बघून मार्शल आर्ट शिकण्याची इच्छा पूर्ण केली असून त्यात त्याला अनेकदा गंभीर जखमा झाल्या आहेत. मात्र त्याने हार न मानता मार्शल आर्टचा सराव सुरु ठेवला आहे. त्याचे कुटुंबीय गरीब आहेत त्यामुळे त्याची प्रशिक्षण फी भरू शकत नाहीत. त्यातच वडिलांना अर्धांगवायू झाल्याने परिस्थिती अधिक बिकट आहे. पैसा कमी असला तरी अब्बासची महत्वाकांक्षा जबरदस्त आहे.


यातूनच त्याने काबुलच्या आयकॉनिक दारूल अमन पॅलेस मध्ये त्याची कला सादर केली आणि त्याचे फोटो फेसबुक, सोशल मिडीयावर टाकले तेव्हा त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली अशे. अब्बासचा ननचक्कू म्हणजे चेन स्टिक कशी पकडायची याचा अभ्यास दांडगा असून ही कला त्याने ब्रूसच्या फिस्ट ऑफ फ्युरी आणि वे ऑफ द ड्रॅगन चित्रपट पाहून आत्मसात केली आहे. त्याला फोनवर हजारो मेसेज आणि फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत पण सर्वात महत्वाचे म्हणजे ही इज बॅक या नावाने त्याचा एक चित्रपट तयार होत आहे. २८ जानेवारी २०१९ रोजी त्याचे शुटींग सुरु झाले असून ते कोसावा, कंबोडिया, रशिया, थायलंड, युएसए या देशात होणार आहे.