आर्यन लेडीने ‘मदर्स डे’ला दिला जुळ्या मुलींना जन्म


बंगळुरु : मातृत्त्व दिनाच्या दिवशी आयरन लेडी ऑफ मणिपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इरोम चानू शर्मिला यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यांनी जुळ्या मुलींना बंगळुरु येथील क्लाऊडनाईन रुग्णालयाच्या मल्लेश्वरम शाखेत जन्म दिला. त्यांना नागरी अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखले जाते. शर्मिला आणि त्यांचे पती डेसमॉन्ड कोटिन्हो यांनी मुलींचे नाव निक्स सखी आणि ऑटम तारा असे ठेवले आहे. शर्मिला यांची पहिली मुलगी निक्स सखीचे नाव त्यांच्या आई इरोम सखी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. काहीच काळापूर्वी इरोम सखी यांचे निधन झाले होते.

आता शर्मिला यांची प्रकृती स्थिरावत आहे. त्यांच्या मुलींचे फोटो लवकरच सार्वजनिक केले जाईल. सी सेक्शन डिलीव्हरीच्या माध्यमातून शर्मिला यांनी मुलींना जन्म दिला, असे क्लाऊडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मुलींना मातृत्त्व दिनाच्या दिवशी जन्म देणे हा निव्वळ संयोग आहे. हे पूर्वनियोजित नव्हते. शर्मिला यांची प्रसुती आम्ही पुढील आठवड्यात करणार होतो. पण त्यांना शनिवारी रात्री प्रसुतीकळा होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी रविवारी सकाळी 9.20 वाजता जुळ्या मुलींचा जन्म दिला. येत्या मंगळवार, बुधवारपर्यंत शर्मिला यांना रुग्णालयातून सुट्टी मिळेल, असे डॉ. श्रीपाद विनेकर यांनी सांगितले.

Leave a Comment