जपानची ताशी ४०० किमी वेगाने धावणारी अल्फा एक्स बुलेट ट्रेन


जपानमध्ये अतिशय वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन जगात प्रसिद्ध आहेत पण अजूनही जपानी संशोधकानी त्यावरचे संशोधन थांबविलेले नाही. नेक्स्ट जनरेशन अल्फा एक्स ही जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन सादर करून त्यांनी हे सिद्ध केले आहे. या ट्रेनच्या चाचण्या तीन वर्षे घेतल्या जात आहेत आणि ही ट्रेन ताशी ४०० किमी वेगाने धावू शकणार असल्याचे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे. या ट्रेनला १० डबे आहेत आणि ती ताशी ३६० किमीच्या वेगाने नेहमी धावेल असे समजते. ही ट्रेन २०३० पासून तिचा नियमित प्रवास सुरु करणार आहे.सिल्व्हर रंगाच्या या ट्रेन वर हलक्या हिरवी रंगाचा पट्टा रेखला गेला आहे.

जेआर इस्ट रेल कंपनीचे अधिकारी म्हणाले, आम्ही केवळ वेग वाढविणे हे उद्दिष्ट ठेवलेले नाही तर प्रवाशांची सुरक्षा आणि आराम यावरही लक्ष दिले आहे. या नव्या बुलेट ट्रेनचे नाक ७२ फुट लांबीचे आहे त्यामुळे ट्रेन सर्वाधिक वेगाने प्रवास करत असली तिच्यावरचा दबाव कमी असेल आणि आवाजही कमी होईल. बोगद्यातून जाताना या बाबी विशेष महत्वाच्या असतात. ही ट्रेन टोक्यो ते सप्पोरो या दोन शहरातील ११६३ किमीचे अंतर अवघ्या साडेचार तासात पार करेल.

या ट्रेनसाठी अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले आहे. ट्रेनच्या रुफवर एअर ब्रेक आहेत शिवाय पारंपारिक ब्रेक आणि ट्रॅकच्या जवळ मॅग्नेटिक प्लेट्स बसविल्या गेल्या आहेत. ही ट्रेन म्हणजे सुपर लग्झरी आणि हाय लेव्हल कम्फर्टचा नमुना आहे. सध्या चीनची फ्युजिंग हाव ही ट्रेन जगातील वेगवान ट्रेन असून तिचा वेग ताशी ३५० किमी आहे. जपानची अल्फा एक्स सुरु झाली कि ती या ट्रेनपेक्षा १० किमी अधिक वेगाने घावणार आहे. मात्र जपानच्या मक्ग्लेव्ह ट्रेनने चाचणी दरम्यान २०१५ मध्ये ताशी ६०३ किमीचा वेग गाठला होता त्याची बरोबरी नवी ट्रेन करू शकणार नाही.

Leave a Comment