फ्रांस देशातील आगळे वेगळे ‘ल पॅले इडेआल’ (le palais idea)


फ्रांस मधील ओटरिव (Hauterives) या ठिकाणी असलेली ‘ल पॅले इडेआल’ ही हटके महालवजा इमारत ही एखाद्या राजाने किंवा एखाद्या शाही सरदाराने बनविलेली इमारत नाही. ही इमारत बनविली आहे फर्डिनांड शेवाल नामक एक पोस्टमनने. आणि विशेष गोष्ट अशी, की हा पोस्टमन दररोज ज्या भागांमध्ये पत्रवाटप करण्यासाठी जात असे, त्या भागांमधील दगड तो रोज उचलून आणीत असे. हे दगड बांधकामासाठी वापरत अखेर त्याने आपल्या स्वप्नातला आगळा वेगळा लहानसाच का होईना, पण महाल उभा केला. ही महालवजा इमारत म्हणजेच ‘ल पॅले इडेआल’ आहे.

शेवालचा जन्म फ्रांसमधील एका लहानशा गावामध्ये झाला. वयाच्या तेराव्या वर्षी शेवालने शालेय शिक्षण सोडले. पैसे कमाविण्यासाठी काही तरी उपजीविकेचे साधन असणे आवश्यक होते, त्यामुळे स्थानिक बेकरकडे बेकिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी फर्डिनांड त्याच्याकडे कामाला राहिला. मात्र पुढे बेकिंगचा व्यवसाय सुरु न करता फर्डिनांडने पोस्टमनची नोकरी स्वीकारली. आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी आपण एखादी लहानशी महालवजा इमारत बांधावी असे फर्डिनांडचे स्वप्न होते. पण काळ सरत गेला, तसे हे स्वप्नही मागे पडत गेले.

एकदा पत्रवाटप करीत हिंडत असताना अचानक फर्डिनांडला जोराने ठेच लागली. आपला पाय कुठल्या गोष्टीमुळे अडखळला हे पाहण्यासाठी फर्डिनांड खाली झुकला असता, त्याला रस्त्यावर पडलेला एक गुळगुळीत दगड दिसला. हा दगड काहीसा वेगळा, गुळगुळीत, चमकदार आणि विचित्र आकाराचा होता. असा दगड फर्डिनांडने या पूर्वी कधीच पहिला नसल्याने त्याने हा दगड आपल्या खिशामध्ये घातला आणि आपल्यासोबत घरी घेऊन आला. या दगडाबद्दल फर्डिनांडला विलक्षण कुतूहल वाटू लागले. असे आणखी काही दगड सापडतात का हे पाहण्यासाठी फर्डिनांड दुसऱ्या दिवशी परत त्याच ठिकाणी गेला. यावेळी त्याला तसेच, पण अधिक सुंदर असे अनेक दगड सापडले. या दगडांचा वापर करून एका लहानशा महालवजा इमारतीचे निर्माण करण्याचा विचार फर्डिनांडने आपल्या मनाशी पक्का केला. तिथून पुढे तेहतीस वर्षे फर्डिनांड हे दगड एकत्र करीत राहिला, आणि अखेरीस त्याच्या स्वप्नातील महाल साकार होऊ लागला.

या महालावजा इमारतीची तटबंदी आणि बाहेरील भिंती बनविण्यासच फर्डिनांडला वीस वर्षांचा काळ लागला. सुरुवातीला त्याला सापडलेले दगड तो खिश्यांमध्ये भरून आणत असे, पण जसा कामाचा वेग वाढला, तसे फर्डिनांडने दगड गोळा करून उचलून आणण्यासाठी हातगाडीचा वापर सुरु केला. आता फर्डिनांड रात्रीच्या वेळी दगड एकत्र करण्याचे काम करू लागला. अखेरीस तेहतीस वर्षांनी फर्डिनांडच्या स्वप्नातील महाल उभा राहिला. आपल्या मृत्यूनंतर आपल्याला याच महालामध्ये दफन केले जावे ही फर्डिनांडची इच्छा होती, पण तसे करण्यास फ्रेंच शासनाने त्याला अनुमती न दिल्याने पुढील आठ वर्षे फर्डिनांडने स्वतःसाठी ओटेरिव दफनभूमीमध्ये खास समाधीस्थळ बांधण्यात घालविले. समाधीस्थळ बांधून पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एकाच वर्षामध्ये त्याचा मृत्यू झाला. याच समाधीस्थळामध्ये फर्डिनांडला दफन केले गेले. फर्डिनांडने बांधलेले ‘ल पॅले इडेआल’ आता एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. नाताळचा दिवस, नूतन वर्षाचा दिवस आणि १५-३१ जानेवारी हे दिवस सोडल्यास इतर वर्षभर हे स्थळ पर्यटकांसाठी खुले असते.

Leave a Comment