आता खेळणी विकणार मुकेश अंबानी


ब्रिटिशकालीन जुनी कंपनी हॅमलेजच्या खरेदीचा करार भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पूर्ण केला आहे. अंबानींनी 67.96 मिलियन पौंड म्हणजे तब्बल 620 कोटी रुपये खर्च करून 259 वर्ष जुनी हॅमलेज कंपनी विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रसिद्ध कंपनीच्या व्यापारात मागील काही काळात झालेली घट पाहता नफा मिळवण्यात अपयश येत असल्यामुळे आपली मालकी विकायचा निर्णय हॅमलेज कंपनीने घेतला होता.

सध्या हाँगकाँगच्या सी बॅनर इंटरनॅशनल कंपनीकडे हॅमलेजचा मालकी हक्क आहे, या कंपनीने 2015 मध्ये हॅमलेज कंपनी तब्बल 100 मिलियन पौंड म्हणजेच 909 कोटींना विकत घेतली होती. यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीच्या, रिलायन्स ब्रँड लिमिटेड व सी बॅनर इंटरनॅशनल अंतर्गत झालेल्या करारानुसार या हाँगकाँगच्या कंपनीकडून हॅमलेजची 100 टक्के मालकी अंबानींनी प्राप्त केली आहे. लंडनमध्ये 1760 मध्ये हॅमलेज या कंपनीची स्थापना झाली.

लहान मुलांच्या खेळण्यांचा हॅमलेज हा प्रसिद्ध ब्रँड असून 18 देशातील 167 दुकानांमध्ये यांची उत्पादने विकली जातात. चीन, जर्मनी, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व या देशांचा त्यात समावेश आहे. हॅमलेजचा भारतामध्ये विक्रीसाठी यापूर्वी रिलायन्ससोबत करार होता. या अंतर्गत भारतातील 29 शहरांमध्ये हेमलेजची 88 दुकाने आहेत.

यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीच्या परदेशातील मालकीची ही पहिली कंपनी ठरली आहे. टाटा मोटर्सने यापूर्वी ‘जग्वार’, ‘लँड रोव्हर’ या कंपन्यांचे मालकी हक्क 230 कोटी खर्च करून विकत घेतले होते. रिलायन्स ब्रँडचे अध्यक्ष आणि सीईओ दर्शन मेहता याबाबत माहिती देताना सांगतात की, रिलायन्स या करारामुळे भारतीय कंपनीचे नाव जगभरातील व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध होणार आहे, हॅमलेज कंपनीचा इतिहास पाहता या ब्रिटिशकालीन कंपनीने प्रयोगात्मक विक्रीचा पाया रचून व्यापारात अनेक बदल घडवून आणले होते त्यामुळे आज या कंपनीचे मालकी हक्क मिळवणे ही स्वप्नपूर्ती म्हणता येईल.

Leave a Comment