आरएसएसने मोदी जर मागासवर्गीय असते तर त्यांना पंतप्रधान केले नसते


लखनऊ: सध्या राजकीय स्वार्थासाठी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मागासवर्गीय (ओबीसी) म्हणवून घेत आहेत. पण खरंच मोदी मागासवर्गीय असते तर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान होऊन दिले असते का? संघाने कल्याण सिंह यांच्यासारख्या नेत्याची काय अवस्था केली, हे संपूर्ण देशाने पाहिले नाही का, असा जळजळीत सवाल बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या जागांसाठी येत्या १२ तारखेला मतदान होईल. त्यामुळे येथील प्रचाराला सध्या कमालीची रंगत चढली आहे. मायावती यांनी या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. मायावतींनी यावेळी सपा-बसपची महाआघाडी जातीयवादी असल्याचा नरेंद्र मोदींचा आरोप फेटाळून लावला. मायावती यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांचा हा आरोप अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. जातीयवादाच्या शापामुळे पीडीत असणारे लोक जातीयवादी कसे असू शकतात? मोदी ओबीसी नसल्यामुळे त्यांना कधीही या परिस्थितीचा सामना करावा लागला नसल्यामुळेच ते अद्वातद्वा बोलत असल्याची टीकाही यावेळी मायावती यांनी केली.

तसेच महाआघाडीवर टीका करण्याऐवजी मोदींनी गुजरातमधील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. मला समजले आहे की, दलितांना त्याठिकाणी सन्मानाने जगता येत नाही. त्यांच्यावर अन्याय केले जातात. तसेच भाजप नेत्यांकडून सध्या ज्याप्रकारची वक्तव्ये केली जात आहेत त्यावरून मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. परिणामी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे नरेंद्र मोदींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असे मायावती यांनी सांगितले.

Leave a Comment