भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले अत्याधुनिक लढाऊ ‘अपाची’ हेलिकॉप्टर


नवी दिल्ली – अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर ‘अपाची’ हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे अपाची हेलिकॉप्टर अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर सुपूर्द करण्यात आले. अमेरिकेबरोबर भारताने २२ अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे. ट्रम्प प्रशासनाने मागच्या वर्षी भारताला अपाची हेलिकॉप्टर विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिली.

अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र अॅरीझोनामध्ये असून जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये अपाची हेलिकॉप्टरची गणना होते. भारतीय हवाई दलाची क्षमता या हेलिकॉप्टरमुळे कैकपटीने वाढणार आहे. या हेलिकॉप्टर्सचा हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये तळ असेल.

२२ पैकी अकरा अपाची अत्याधुनिक एएनय/एपीजी-७८ लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमने सुसज्ज असतील. ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची तसेच शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. अपाची दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-३५ ची जागा घेतील. अपाची क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले हेलिकॉप्टर आहे.

अमेरिकन बनावटीचे एएच-१ कोब्रा हेलिकॉप्टर पाकिस्तानी लष्कराकडे आहे. टर्कीकडून त्यांना तीस टी-१२९ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. ही दोन्ही लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. चीनकडे झेड-१० लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. दोन महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला. हे हेलिकॉप्टर हॉवित्झर तोफा वाहून नेण्यास सक्षम आहे.

Leave a Comment