निवडणुकीमुळे फुलबाजारात बल्ले बल्ले


देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमात अनेक व्यवसायात कोट्यावधीची उलाढाल होत असते त्याला एरवी फारसा महत्वाचा नसलेला फुलबाजार अपवाद नाही. आशियातील सर्वात मोठी फुलमंडी अशी ओळख असलेल्या दिल्लीतील गाझीपुर फुलबाजारात या दिवसात व्यावसायिकांना क्षणाचीही उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे. या बाजारात फुलांचा आणि व्यवसायाचा जाऊन बहर आला आहे. फुले, हार, मोठ्या माळांना सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचंड मागणी असून अगोदर मागणी नोंदविल्याशिवाय पुरवठा करणे येथील व्यापाऱ्यांना अशक्य बनत चालले आहे.


पंतप्रधान मोदी यांनी त्याच्या वाराणसी मतदारसंघात केलेल्या रोड शो पासून ते राहुल गांधी याच्या रॅलीज पर्यत देशाच्या प्रत्येक भागात दिल्लीच्या गाझीपुर फुल बाजारातील फुलांनी हजेरी लावली आहे. गुलाब, झेंडू यांना सर्वाधिक मागणी आहे आणि ती इतकी प्रचंड आहे कि व्यापारी ती पुरी करताना व्यापारी, मजूर साऱ्यांची धांदल उडते आहे. नेत्याच्या स्वागतासाठी खास हार डिमांड मध्ये आहेत. फुलांच्या मागणीत वाढ असल्याने दर वाढले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडून हारांना मागणी आहे. त्यामुळे त्याचे दर २० टक्के वाढले आहेत.


भाजप कडून झेंडू आणि हिरव्या पानांना अधिक मागणी आहे तर कॉंग्रेसकडून तीन रंगी हार डिमांड मध्ये आहेत. तर आम आदमी पक्षाकडून मिक्स फुलांना मागणी आहे. मोदी यांच्या वाराणसी रोड शोच्या वेळी १० क्विंटल म्हणजे १००० किलो गुलाब पाकळ्या मागविल्या गेल्या होत्या. पूर्वी १०० रुपयात मिळणाऱ्या हारासाठी आता २०० रुपये मोजावे लागत आहेत तर १ किलो गुलाब पाकळ्यांचा दर ४० रुपयांवरून १०० रुपयांवर गेला आहे. नेत्यांच्या मोठ्या रॅलीज मध्ये सजावटीसाठी मोठे हार मागविले जातात पण त्याची मागणी १० ते १५ दिवस अगोदर नोंदवावी लागत आहे. १० ते १५ फुट लांबीच्या या हारांच्या किमती त्यात वापरण्यात येणाऱ्या फुलांनुसार २५ ते ५० हजाराच्या दरम्यान आहेत. एक हार तयार करण्यासाठी १० मजूर लागतात.

निवडणूक काळात या बाजारातील प्रत्येक दुकान दिवसाला २ ते अडीच लाखाची उलाढाल करत आहे. हा बाजार निवडणूक निकाल आल्यानंतरही काही काळ असाच तेजीत राहील असे येथील व्यापारी सांगत आहेत.

Leave a Comment