तिरुपती बालाजीच्या खजिन्यात ९ हजार किलोपेक्षा अधिक सोने


आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान श्रीमंत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेच. या वैभवशाली मंदिराच्या खजिन्यात ९ हजार किलोपेक्षा अधिक सोने असल्याची माहिती श्री वेंकटेश्वर मंदिर व्यवस्थापनाने नुकतीच जाहीर केली आहे. अर्थात तिरुमला तिरुपती देवस्थानम त्यांच्या मालकीच्या असलेल्या सोन्याच्या साठ्याचा हिशोब देणे नेहमीच टाळत आले आहे. दररोज ५० हजाराहून अधिक संख्येने येणारे भाविक बालाजीला अर्पण करत असलेले डागदागिने, सोने यांचा हिशेब बहुतेक वेळा दिला जात नाही. पण यंदा तमिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी १३८१ किलो सोने जप्त केल्याने हा हिशोब देवस्थानला द्यावा लागला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात १७ एप्रिलला तिरुवल्लुर जिल्यात पंजाब नॅशनल बँकेच्या चेन्नई शाखेतून तिरुपतीच्या खजिन्यात १३८१ किलो सोने आणले जात होते त्यावेळी ते पकडले गेले तेव्हा देवस्थानने सुरवातीला ते सोने त्यांचे असल्याचे नाकारले होते व नंतर हे सोने आमचे आहे पण मंदिरात आणले जात आहे याची कल्पना नव्हती अशी विधाने केली होती. वाद वाढला तेव्हा सोने जोपर्यंत आमच्या खजिन्यात येत नाही तोपर्यंत ते आमचे नाही अशी भूमिका देवस्थानने घेतली होती. त्यावर बँकेने कर विवरण पत्र दाखवून व्याजापोटी ७० किलो अधिक सोने देवस्थानला दिल्याचे आयकर अधिकाऱ्यांना सांगितले होते.

त्यानंतर देवस्थानने ७२३५ किलो सोने विविध राष्ट्रीयीकृत बँकात ठेव म्हणून ठेवल्याचे व खजिन्यात १९३४ किलो सोने असल्याचे स्पष्ट केले आहे. यात १३८१ किलो पंजाब बँकेने तीन वर्षाची मुदत संपल्यावर परत केलेले सोने समविष्ट आहे. स्टेट बँकेत देवस्थानने ५३८७ किलो, इंडिअन ओव्हरसीज बँकेत १९३८ किलो सोने ठेव म्हणून ठेवले आहे. देवस्थानचे वार्षिक उत्पन्न १ हजार ते १२०० कोटी इतके असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment