आपल्याच गावाचे नाव सांगताना शरमतात गावकरी


नावात काय आहे असे प्रसिद्ध नाटककार, लेखक शेक्सपिअरने म्हणून ठेवले असले तरी नावात बरेच काही असते याचा अनुभव हरियाना राज्यातील काही गावाचे गावकरी घेत आहेत. आपल्याच गावाचे नाव सांगायची पाळी आली तर त्याच्यावर शरमिंदे व्हायची वेळ येते त्यामुळे गेली दहा वर्षे गावांची नावे बदलावी म्हणून ते प्रयत्न करत आहेत. पण गावाचे नाव बदलायचे तर त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची परवानगी, त्यानंतर केंद्राची परवानगी अशी लांबलचक प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे गावाचे प्रतीनिधी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत.


या गावकरयाची अशी तक्रार आहे, कि आम्हाला जर कुणी गावाचे नाव विचारले तर ते सांगायचे कसे असा प्रश्न पडतो कारण नावावरून गाव कसे याचा अंदाज बांधला जात असतो. उदाहरण द्यायचे तर एका गावाचे नाव चोरपूर आहे. नाव ऐकले कि लोक हसतात, चेष्टा करतात आणि या गावात चोर राहतात का असे विचारतात. या गावाचे नाव साधुपुर करावे अशी गावकरी मागणी करत आहेत.


हरियानात किन्नर, कुत्ताबाद, कुतीयावाली, कुतीयाखेडी, लुला अहिर, दुर्जनपूर अश्या नावांची गावे आहेत. दुर्जनपूरचा गावकऱ्यांनी त्यांच्या गावाचे नाव सज्जनपूर करावे अशी मागणी केली आहे. दुर्जनपूर म्हणजे दुर्जन लोकांचे गाव. असल्या नावामुळे आमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो म्हणून नाव बदलावे असे अर्ज दिले जात आहेत असे गावकरी सांगतात. किन्नर हा शब्द तृतीयपंथीय लोकांसाठी वापरला जातो त्यामुळे गावाचे नाव ऐकले कि लोकांचा भलताच समज होतो.

कुत्ता हा शब्द शिवी म्हणून बरेच वेळा वापरला जातो. तो गावाच्या नावात आल्याने गावकरी नाराज आहेत. कुत्ताबाद या गावाचे नाव ढाणी होते पण या गावात कुत्री खूप होती आणि नवीन आलेल्या लोकांना ती चावायची म्हणून गावाचे नाव कुत्ताबाद पडले असे सांगितले जाते. तसेच कुतीयावली या गावाचे नाव शहजादपूर असे होते पण ब्रिटीश राजवटीत एका ब्रिटीश अधिकाऱ्याला एक कुत्री चावली तेव्हा चिडून त्याने गावाचे नाव कुतीयावली केले अशी हकीकत आहे. कुतीयानगर या गावाचे नाव बदलून ते प्रेमनगर केले जावे अशी गावकरी मागणी करत आहेत.

Leave a Comment