महिलेचा समुद्रात पडलेला फोन रशियन हेर व्हेलने परत दिला


नॉर्वेच्या समुद्रात मित्रांसोबत बोटिंग करत असलेल्या एका महिलेचा हातातून निसटून समुद्रात पडलेला स्मार्टफोन एका क्षणात एका पांढरया देवमाशाने तिला परत आणून दिला असल्याचा व्हिडीओ प्रकाशित झाला असून सोशल मिडीयावर तो अनेकांनी पहिला आहे. हा मोबाईल परत करणारा या व्हेलचा व्हिडीओ सोशल मिडियावर येण्यापुर्वीच हा मासा रशियन हेर असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. गेल्या काही दिवसापूर्वी नॉर्वेच्या किनाऱ्याला नॉर्वेच्या बोटीजवळ वारंवार येत असलेला पांढरा देवमासा रशियाने प्रशिक्षित केलेला हेर मासा असावा याची जोरदार चर्चा सुरु झाली होती कारण या माश्याच्या अंगाभोवती एक पट्टा होता आणि त्यात कॅमेरा होल्डर होता.

मात्र आता हा मासा लोकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. नॉर्वेच्या किनाऱ्यावर इना मन्सिका ही महिला तिच्या मित्रमंडळीसोबत नौकानयन करत असताना तिचा फोन हातातून निसटला आणि सरळ समुद्रात पडला. तिने मित्रांना मदत करण्याचे आवाहन करण्यापूर्वीच खोल समुद्रातून आलेल्या या माशाने तिचा फोन तोंडात धरून वर आणला आणि त्या महिलेला दिला. पाण्यात बुडाल्याने फोन खराब झाला होता मात्र समुद्रात बुडालेला फोन व्हेलने परत द्यावा हा या मित्रमंडळीना मोठा आश्चर्याचा धक्का होता. त्यामुळे त्याचा व्हिडीओ लगेच सोशल मिडीयावर आला.

२६ एप्रिल रोजी नॉर्वेच्या किनाऱ्यावर बोटीजवळ आलेला हा बेल्युगा जातीचा व्हेल अधिकार्यांनी पहिला होता. त्याच्यावर पट्टा बांधला गेला होता. त्यामुळे तो रशियाने हेरगिरीचे प्रशिक्षण दिलेला देवमासा असाव असा अंदाज होता. सध्या नॉर्वे सरकारने या व्हेलला वाचविण्याचे ठरविले असून त्याची रवानगी आईसलंड मधील अभयारण्यात केली जाईल असे नॉर्वेचे डायरेक्टर ऑफ फिशरीजचे जोर्गेन रीविग यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार खुल्या समुद्रात या माशाच्या जीवाला धोका होऊ शकेल त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.

Leave a Comment