नरमुखी गणेशाचे जगातील एकमेव मंदिर


गणेश, गजानन, गजमुख, गजवदन अश्या अनेक नावानी आपण गणपतीबाप्पाला आळवत असतो. ही नवे त्याचे स्वरूप वर्णन करणारी आहेत. म्हणजे हत्तीचे मुख असलेला तो गणपती. भारतातच नव्हे पण जेथे म्हणून गणपतीची पूजा होते अश्या सयाम, थायलंड सारख्या सर्व देशात आणि जेथे हिंदू राहतात त्या सर्व देशात गणपतीचे सोंडधरी रूप आपण पाहतो. भारतात मात्र एक मंदिर याला अपवाद असून तमिळनाडूतील तीलतर्पणपुरी नावाच्या गावात माणसासारखा चेहरा असलेल्या गणेशाची मूर्ती आहे. त्याला अदि विनायक मंदिर असे म्हटले जाते. गणेशाला हत्तीचे वदन मिळण्यापूर्वी गणेशाचे रूप ही मूर्ती दर्शविते.


या मंदिराचे आणखीएक विशेष म्हणजे येथे लोक पितरांना तर्पण करण्यासाठी येतात. पितृदोष नाहीसा व्हावा म्हणून येथे पितरांना तर्पण केले जाते. यामागे अशी लोकमान्यता आहे कि श्रीरामाने येथे दशरथाला तर्पण दिले होते आणि पूर्वजांना शांती मिळावी म्हणू पूजा केली होती. तीच परंपरा आजही पाळली जाते. हे मंदिर दक्षिणात्य मंदिराप्रमाणे भव्य नाही. तरीही या वैशिष्ट्यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी असते. तमिळनाडूतील कुतनूर पासून दोन किमीवर हे मंदिर आहे.


या स्थानाला तिलतर्पणपुरी असे नाव पडण्यामागे येथे पितरांना केले जाणारे तर्पण हाच भाव आहे. तीलतर्पण म्हणजे पूर्वजांना समर्पित आणि पुरी म्हणजे नगर. या मंदिराची कथा अशी सांगतात, श्रीराम जेव्हा दशरथाच्या पिंडांना दान देत होते तेव्हा पिंडाचे किडे होऊ लागले. श्रीरामाने यावर उपाय शोधण्यासाठी शिवाची उपासना केली तेव्हा शिवाने मंथखनम (तीलतर्पणपुरीचे प्राचीन नाव) येथे जाऊन पिंडदान करण्यास सांगितले. तेव्हा राम येथे आले आणि त्यांनी पिंडदान केले तेव्हा त्या चार पिंडांची चार शिवलिंगे बनली. त्यामुळे या मंदिराला मुक्तेश्वर टेम्पल असेही नाव मिळाले.

या मंदिराला लागून शिवमंदिर आहे तसेच सरस्वती मंदिर आहे. सरस्वती मंदिर ओट्टूकुठार नावाच्या कवीने बनविले आहे.

Leave a Comment