जूनपासून सुरू होणार ५जी स्पेक्ट्रमची चाचणी


नवी दिल्ली – अनेक ग्राहकांना दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती ठरू शकणाऱ्या ‘५ जी’ स्पेक्ट्रमची प्रतिक्षा आहे. जूनपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी या ‘५ जी’ची चाचणी घेण्यात येणार आहे. दूरसंचार मंत्रालयाच्या पॅनेलने याबाबतची शिफारस केली आहे.

तीन महिन्यांसाठी एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओला ‘५ जी’ची चाचणी घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी शिफारस दूरसंचार मंत्रालयाच्या पॅनेलने केली आहे. ही मुदत नेटवर्क स्थिर करण्यासाठी एक वर्षापर्यंत वाढविली जावू शकते. सॅमसंग, नोकिया आणि एरिकसनला ‘५ जी’साठी यंत्रणा पुरविण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. पुढील १५ दिवसात ‘५ जी’च्या चाचणीची परवानगी दिली जाणार आहे. तर जूनपासून दूरसंचार कंपन्या ‘५ जी’ची सुरुवात करू शकतात.

रिलायन्स जिओची ५ जीची चाचणी घेण्यासाठी सॅमसंग, नोकियाची एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाची एरिक्सनबरोबर भागीदारी झाली आहे. ‘५ जी’ चाचणीत चीनची बलाढ्य दूरसंचार कंपनी हूवाई सहभागी होणार आहे की नाही, याबाबत दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले नाही. ‘५ जी’च्या चाचणीनंतर दूरसंचार कंपन्यांना सप्टेंबरनंतर स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.

Leave a Comment