ब्रिटनच्या राजघराण्यात वारसदारांचा क्रम रॉयल बेबीच्या जन्माने बदलला


लंडन : नव्या पाहुण्याचे ब्रिटनच्या राजघराण्यात आगमन झाले आहे. 6 मे रोजी प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना मुलगा झाला. ब्रिटनच्या राजगादीच्या वारसदारांच्या यादीत हा ‘रॉयल बेबी’ सातव्या क्रमांकावर असेल. बाळाच्या आगमनामुळे क्वीन एलिझाबेथ यांचे द्वितीय पुत्र आठव्या क्रमांकावर गेले आहेत.

क्वीन एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) हे पहिले उत्तराधिकारी आहेत. क्वीन एलिझाबेथ यांचा सर्वात मोठा नातू अर्थात प्रिन्स चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स विल्यम्स (ड्यूक ऑफ केंब्रिज) हे राजगादीचे दुसरे वारसदार ठरतात. क्वीन एलिझाबेथ यांचा सर्वात मोठा पणतू, अर्थात प्रिन्स विल्यम्स यांचा मोठा मुलगा प्रिन्स जॉर्ज (ऑफ केंब्रिज) याचा तिसरा क्रमांक लागतो. आता प्रिन्स जॉर्ज सहा वर्षांचा होईल.त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर त्याची धाकटी बहीण प्रिन्सेन शार्लेट (ऑफ केंब्रिज) आहे. चार वर्षांची ती आहे. तर जेमतेम एक वर्षांचा प्रिन्स ल्युईस (ऑफ केंब्रिज) पाचव्या क्रमांकाचा वारसदार आहे.

प्रिन्स हॅरी राजघराण्याचा सहावा वारसदार आहे. प्रिन्स हॅरी हे प्रिन्स चार्ल्स यांचे दुसरे सुपुत्र, म्हणजेच प्रिन्स विल्यम्स यांचे धाकटे बंधू असून त्यांच्यानंतर नव्याने जन्मलेले बाळ सातव्या क्रमांकाचे वारसदार आहे. क्वीन एलिझाबेथ यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स अँड्र्यू हे बाळाच्या जन्मामुळे आठव्या क्रमांकाचे उत्तराधिकारी झाले आहेत, तर तृतीय पुत्र प्रिन्स एडवर्ड हे अकराव्या स्थानी आहेत. हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचे चौथे पतवंड ठरले आहे.

Leave a Comment