पैगंबरावर आधारित चित्रपट बनवण्याची कोणी हिंमत करु शकतो का? गिरीराज सिंह


नवी दिल्ली – पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे चर्चेत आले आहेत. यासाठी त्यांनी एका मल्ल्याळम चित्रपटाचा दाखला दिला. ‘सेक्सी दुर्गा’ सारखा चित्रपट एखादी व्यक्ती बनवू शकते. पण असा कोणी आहे का जो पैगंबर मोहम्मद किंवा फातेमा यांच्यावर आधारित चित्रपट बनवू शकतो का? असे सिंह यांनी म्हटले आहे.

यापूर्वी सिंह यांच्यावर मुस्लिमांविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिहारच्या एका न्यायालयाने त्यांना या प्रकरणी जामीन दिला होता. यानंतर त्यांनी हे भडकाऊ वक्तव्य काही तासांतच केले आहे.

सिंह यांनी दक्षिण दिल्लीतून भाजप उमेदवार रमेश बिधूडी यांच्या प्रचारासाठी एका सभेला संबोधित करताना आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी ‘टुकडे-टुकडे गँग’चा केजरीवाल हे भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते आणि भाकप उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर देशद्रोहाच्या प्रकरणात कारवाई करण्यात केजरीवाल सरकार अडथळा आणत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची दिल्लीत सत्ता येईल, तेव्हाच परिस्थिती सुधारेल, असेही सिंह यांनी म्हटले आहे. बेगूसरायमधून ते भाकप उमेदवार कन्हैया कुमारच्या विरोधातील भाजप उमेदवार आहेत.

Leave a Comment