या ठिकाणी पैसे न देताच करता येते खरेदी


कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्याचा दाम मोजावा लागतो. मग भले ते रुपये असतील, डॉलर असतील, पौंड असतील नाहीतर युरो असतील. भारतातील एका राज्यात मात्र एक ठिकाण असे आहे जेथे खरेदीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. हे ठिकाण आसाम राज्यातील मोरीगाव जिल्ह्यात असून त्याचे नाव आहे जुनबील. येथे दरवर्षी माघ महिन्यातल्या तिसऱ्या आठवड्यात तीन दिवसांची जत्रा भरते आणि येथे होणारी खरेदी विक्री वस्तूविनिमय पद्धतीने केली जाते.


या जत्रेत पहाडी भागात राहणारे आदिवासी आणि अन्य जमाती त्यांचा विक्रीचा माल म्हणजे मैदानी भागात न मिळणारी फळे, अन्य वस्तू आणि शेती उत्पादने घेऊन येतात आणि मैदानी भागातून येणारे आदिवासी त्यांची उत्पादने म्हणजे धान्याची पीठे, सुकी मासळी, लाडू असे पदार्थ आणतात. वस्तूंच्या किमती नक्की केल्या जातात आणि त्यानुसार आपल्याला हवी असलेली वस्तू तेवढ्या किमतीचा आपला माल देऊन विकत घ्यायची अशी ही पद्धत. फार पूर्वी भारतात अनेक गावात ही पद्धत अस्तित्वात होती तेव्हा बारा बलुतेदार गावात असत आणि शेतकरी धान्य देऊन लोहाराकडून लोखंडी अवजारे, सुताराकडून लाकडी सामान, विणकरांकडून कपडा असा व्यवहार करत असत. जगात सध्या फक्त जुनबील येथेच आता ही पद्धत अस्तित्वात राहिली आहे.


गेली ५०० वर्षे या पद्धतीने जुनबील जत्रा भरते आहे. कृषी साहित्य, हळद, आले, मातीची भांडी, खाद्यपदार्थ, असे अनेक प्रकार येथे विकले आणि खरीदले जातात. जत्रा सुरु होण्यापूर्वी जुनबील सरोवरात मासे पकडण्याचा विधी साजरा होतो. शेवटच्या दिवशी इतिहासिक गोभा राजाचा दरबार भरतो. यावेळी राजा येतो आणि जनतेकडून कर जमा करतो. राजाकडून मेजवानी दिली जाते. नृत्य, गायन, कोंबड्यांच्या झुंजी असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.


जत्रेच्या निमित्ताने पहाडी आणि मैदानी आदिवासी एकत्र येतात, बांबूच्या झोपड्यातून राहतात, गप्पा, हास्य विनोद आणि एकत्र जेवणे केली जातात. जत्रेच्या सुरवातीला अग्नीपूजा केली जाते. या जत्रेला साधारण १० हजार आदिवासी जमतात. आसाम सरकार ही जत्रा जगाच्या पर्यटन नकाशावर यावी यासाठी प्रयत्नशील आहे.

Leave a Comment