या छोट्या सुंदर देशाला जागतिक तापमानवाढीचा असा त्रास


पॅसिफिक महासागरातील ऑस्टेलिया आणि हवाई यांच्या मध्ये असलेला जगातील ४ नंबरचा छोटा देश तुवालू सध्या जागतिक तापमानवाढीचा बळी ठरला आहे. कारण जागतिक तपामान वाढीमुळे येथील तापमान इतके वाढले आहे कि लोकांची त्वचा जळते आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे येथे उन्हापासून त्वचेचे रक्षण करणारे सनस्क्रीन मिळत नाही आणि ते खरेदी करायचे असेल तर दीड तासाचा विमान प्रवास करून फिजी येथे जावे लागते.

हा चिमुकला देश अतिशय सुंदर असून नऊ बेटांचा मिळून बनला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा देश विकासशील देश असल्याची घोषणा केली आहे मात्र जागतिक तापमान वाढीमुळे समुद्रपाणी पातळीत होत असलेली वाढ आणि वाढते तापमान यामुळे यातील अनेक बेटे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. किनारे खचणे, दुष्काळ या अन्य समस्या आहेतच या देशाची राजधानी फुनाफुटी मधील प्रिन्सेस मार्गारेट रुग्णालयात जलवायू परिवर्तनामुळे होणारे आजार घेऊन लोक येत असून गेल्या १० वर्षात रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. येथील नागरिक सांगतात तापमान असह्य होते. अंगभर कपडे घालूनही हिटस्ट्रोक व डीहायड्रेशन ही नित्याची बाब बनली आहे. येथे कुठेही सनस्क्रीन लोशन मिळत नाही. ते आयात करावे लागते आणि त्यामुळे महाग पडते. येथील जनता गरीब आहे त्यामुळे त्यांना त्याची किंमत परवडत नाही. अति उन्हामुळे त्वचा लवकर सुरकुतते आणि त्यामुळे विशेषतः महिला वयापेक्षा अधिक म्हाताऱ्या दिसतात.


वास्तविक हा देश अतिशय रम्य आहे. १० हजार लोकसंख्या आणि २६ किमीचा परिसर इतकाच त्याचा आवाका. व्हॅटीकन सिटी,मोनॅको आणि नौरु या देशाच्या खालोखाल या देशाचा छोट्या देश यादीत नंबर आहे. ९ बेटे असलेल्या या देशात बहुतेक वाहतूक बोटीतून होते. राजधानी फुनाफुटी येथे एकमेव विमानतळ असून देशातील ५६ टक्के लोक याच शहरात राहतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा देश अमेरिकेचे महत्वाचे ठाणे बनला होता आणि त्यावेळी बांधला गेलेला रनवे व अन्य अवशेष आजही येथे दिसतात. या देशाला युके कडून १९७८ साली स्वातंत्र्य मिळाले आहे. या बेटांवर नदीनाले नाहीत त्यामुळे पावसाचे पाणी साठवून वापरावे लागते.


नारळीची झाडे, पाम ही येथील उत्पादने असून खोबरे निर्यातीतून देशाला महसूल मिळते. विशेष म्हणजे त्यांचे इंटरनेट सफिक्स टीव्ही हे कॅलिफोर्नियातील एका कंपनीने घेतले असून त्यातून दरवर्षी लाखो डॉलर्सचा महसूल या देशाला मिळतो. हे सफिक्स कंपनी अनेक टीव्ही ब्रॉडकास्त कंपन्यांना विकते. या देशात राजकीय पक्ष नाहीत. दर चार वर्षांनी पार्लमेंटसाठी १५ सदस्य निवडले जातात.

Leave a Comment