बालाकोटमध्ये मारले गेले किमान १७० अतिरेकी, इटालियन पत्रकाराचा शोध


भारतात काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहन ताफ्यावर हल्ला करून ४० जवान शहीद केल्याप्रकरणी भारतीय हवाई दलाने या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तान मधील बालाकोट येथे घुसून जैशच्या दहशतवादी तळावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान १३० ते १७० दहशतवादी ठार झाल्याचा व आणखी किमान ४५ जखमींवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असल्याचा सनसनाटी खुलासा इटालियन पत्रकार फ्रेन्सिसा मरिनो याने स्ट्रिंगर एशिया मध्ये एका लेखात केला आहे. त्याने घेतलेल्या शोधानुसार आणि मिळविलेल्या माहितीनुसार या हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या २० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.


फ्रेन्सिसाच्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे मिराज विमानातून बॉम्बफेक केली तेव्हा दहशतवादी ठार झाल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले होते. पाक सरकारच्या म्हणण्यानुसार हे बॉम्ब झाडांवर पडले. मात्र फ्रेन्सिसाने या बाबत पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा उघडकीस आणला आहे. भारतीय हवाई दलाने पहाटे साडेतीनच्या सुमारास बालाकोटवरील दहशतवादी तळावर हल्ला केला त्यानंतर जवळच असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या शिंक्यारी तळावरून एक तुकडी सकाळी ६ वाजता येथे आली आणि त्यांनी या हल्ल्यात जखमी झालेल्यांना लष्करी रुगणालयात उपचारासाठी नेण्यास सुरवात केली.

जे जे जखमी बरे झाले त्यांना घरी न सोडता पाकिस्तानी लष्कराने कस्टडीत ठेवल्याचा दावा फ्रेन्सिसाने केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने महिनाभर या प्रकरणी शोध घेऊन माहिती मिळविली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात किमान १३० ते १७० अतिरेकी ठार झाले आहेत. त्यात बॉम्ब बनविणे, हत्यार प्रशिक्षण देणारे ११ प्रशिक्षक होते आणि त्यात दोघे अफगाणी होते असेही त्याचे म्हणणे आहे. पाक सरकारने या हल्ल्यात जे ठार झाले त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिल्याचा दावा त्याने केला आहे. हल्ला झालेल्या भागात जाण्यासाठी रस्ता कच्चा आहे आणि हा रस्ता बंद केला गेला आहे असेही त्याचे म्हणणे आहे.


भारतीय हवाई दलाने बालाकोट हल्ल्यासाठी वापरलेले बॉंब इस्त्रायलचे स्पाईस २००० हे आहेत. हे अतिशय धोकादायक बॉम्ब असून हे बॉम्ब प्रथम १ मीटर खोल जमिनीत घुसतात आणि त्यानंतर त्यांच्या स्फोट होतो. त्यामुळे इमारतींना मोठे नुकसान न होता इमारतीच्या आतील भागाला नुकसान होते. भारत सरकारने या बॉम्बचे पुढचे व्हर्जन खरेदी करण्यासाठी इस्त्रायल बरोबर सौदा केला असल्याचे एएनआयच्या अहवालात नमूद केले गेले आहे. हे अॅडव्हान्स व्हर्जन कोणतीही इमारत नष्ट करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने वापरता येतात. हे बॉम्ब मिराज बरोबर सुखोई ३० मध्येही वापरता येणार आहेत.

Leave a Comment