क्रिकेट वर्ल्डकपची भारतीयांनी आत्ताच खरेदी केली ८० हजार तिकिटे


इंग्लंड येथे येत्या ३० मे पासून सुरु होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मधील टीम इंडियाच्या सामन्यांची तिकिटे मिळविण्यासाठी आत्ताच रस्सीखेच सुरु झाली आहे. आत्तापर्यंत ८० हजार तिकिटे खरेदी केली गेली असून त्यात सर्वाधिक तिकिटे १६ जून रोजी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यासाठी खरेदी केली गेली आहेत. या हाय व्होल्टेज सामन्याची तिकिटे ४८ तासात संपल्याचे सांगितले जात आहे.

भारतात क्रीकेटची लोकप्रियता अफाट आहे. वर्षभर विविध ठिकाणी होत असलेल्या क्रिकेट सामन्यांना क्रिकेटप्रेमी गर्दी करतात. त्यातून आयपीएल, वर्ल्ड कप यासारखे सामने असतील तर तिकिटांसाठी झुंबड उडते. यंदा इंग्लंड मध्ये वर्ल्ड कप सामने होत आहेत आणि टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक क्रिकेट प्रेमी लंडनसाठी बॅग भरून तयारीत आहेत. ब्रिटीश उच्यायोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा किमान ८० हजार भारतीय वर्ल्ड कपसाठी उपस्थित राहणार आहेत. हा आकडा यंदा इंग्लंडच्या व्हिसासाठी आलेले अर्ज आणि गतवेळी इंग्लंडमध्ये टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित राहिलेले भारतीय यांच्या आकडेवारीवरून काढला गेला आहे. अर्थात पूर्ण जगभरातून या सामन्यांसाठी किती प्रेक्षक येतील याचा अंदाज आत्त्ताच वर्तविणे शक्य नसल्याचा खुलासा केला गेला आहे.

भारत पाकिस्तान सामन्यापाठोपाठ भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याच्या तिकीटाना अधिक मागणी असून त्यानंतर अंतिम सामन्याच्या तिकीटाना प्रेक्षकांकडून मागणी आहे. जानेवारी ते एप्रिल या काळात २ लाख लोकांना व्हिसा जारी करण्यात आला आहेच पण सध्या रोज उच्चांयुक्तांकडे किमान ३५०० अर्ज व्हिसा साठी येत असल्याचे समजते.

Leave a Comment