राणे शिवसेनेत राहणार असतील तर मातोश्री सोडणार, उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांना धमकी


मुंबई – स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात शिवसेना सोडण्यामागचे कारण सांगितले असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जर नारायण राणे शिवसेनेत राहणार असतील तर मातोश्री सोडून मी जाईन अशी धमकी दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच राणे यांच्या इंग्रजी भाषेतील ‘नो होल्ड्स बार ‘ आत्मचरित्रात लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या दोन दशकातील घडामोडींवर राणे यांनी या पुस्तकाच्या पानात भाष्य केले असून यात काही गौप्यस्फोटही करण्यात आले आहेत.

शिवसेना मला उद्धव ठाकरे यांच्यामुळेच सोडावी लागल्याचेही राणे यांनी नमूद केले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनीच मला पक्षातून काढून टाकण्याचा तगादा लावला होता. राणे शिवसेनेत राहणार असतील तर मी मातोश्री सोडून जाईन, अशी धमकीही उद्धव ठाकरे यांनी दिली होती असा गौप्यस्फोटही राणे यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे. मनोहर जोशी यांना युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले, जोशी यांनी याचा राग मनात ठेवला होता. उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून जोशी यांनीच पक्षात खलबत चालवली होती. मला डावलून सुभाष देसाई यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारीही उद्धव ठाकरे यांनी केली होती.

युती सरकारच्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव होता. शिवसेनेच्या संपर्कात राष्ट्रवादीचे काही आमदार होते. सरकार बदलाचा डाव यशस्वीही झाला असता पण बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या चर्चेनंतर या डावाला वेगळे वळण लागून डाव फसला असल्याचेही राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

Leave a Comment